फेसबुकवर ‘गढीवरून’ या लोकप्रिय लेखमालेतून आजच्या ग्रामीण जीवनाचं इरसाल, खुसखुशीत दर्शन घडवणारे राजा गायकवाड यांचे ‘गढीवरून’ हे संग्रहित लेखांचे पुस्तक मैत्री प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे… रांगड्या विनोदाच्या माध्यमातून समाजजीवनातल्या विसंगतींवर हसत खेळत क्ष किरण झोत टाकणार्या या लेखसंग्रहातला हा एक लेख… मराठी साहित्य व्यवहार आणि साहित्य संमेलन यांची टोपी उडवणारा…
—-
‘राजाभाऊ, आपल्याला साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा फॉरम भरायचाय.’
‘काय?’
मी उडालोच. तंबूशेट आणि साहित्य संमेलन? ऐकायला देखील वंगाळ वाटत होतं ते.
तंबूशेट आमच्या गावात हातभट्टी चालवतो. छोटेखानी गाव. त्यामुळे सरकारमान्य दुकान नाही. असते तरी लोकांची तितकी क्रयशक्ती नाही. एकूणातच पर्याय नसल्याने तंबूशेटचा धंदा लईच भरभराटीला आलेला होता. मोक्कार पैसा खुळखुळत होता शेठकडं. पण शेठला एक नाद व्हता… पुस्तकं वाचायचा. सदानकदा कामधंदा सोडून गुरुनाथ नाईक, चंद्रकात काकोडकर, बाबा कदम यांची पुस्तकं वाचत बसायचा.
रोज संध्याकाळी माझा ठेपा तंबूशेटकडे असतो. गुरजी असल्यामुळे मला इतरांपेक्षा विशेष सेवा मिळते. उदा. बाकीच्यांना जाड मिठाचा खडा चकना म्हणून तर मला पांढरं बारीक मीठ वगैरे. शिवाय कल्याबाई माझ्याकडे विशेष लक्ष देते.
‘असं कस्काय आलं येकदम डोक्यात?’
‘राजाभाऊ, तुमच्यासारख्या मास्तरड्याला नाई कळणार ही गणितं. आवो पैसे काय रांड बी कमवते. पण रेकग्निशन? रेकग्निशन पायजेल माणसाला आयुष्यात. बेंचो! आपून कितीबी पैसे कमावले आयुष्यात, तरीबी लोकं आपल्याला हातभट्टीवाला म्हणूनच वळखणार. माणसाला कसं… स्टेटस पायजे स्टेटस.’
‘मग तुम्ही राजकारणात का नाही जात?’
‘च्यायला मास्तर, तुझी बुद्धी त्याच्यापलीकडं जातच नाई का रं? राजकारणात जायपेक्षा मी रस्त्यावर उभा राहून लोकांना खाणाखुणा करायचा धंदा पतकरील. ख्याऽऽऽ ख्याऽऽऽ ख्या.’
‘तंबूशेट, अहो पण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचं तर त्यासाठी लेखक असावं लागतंय…’
‘कोण बोललं असं?’
‘कोण बोललं म्हणजे?’
‘साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी माणूस लेखकच पायजेल, ही फालतू माहिती तुम्हाला कोणी पुरवली?’
‘म्हणजे तसा नियमच आहे.’
‘मास्तरा, मागच्या दहा संमेलनाध्यक्षांच्या पाच पुस्तकांची नावे सांग बरं अडीच मिनिटात. आज तुला एक तुंबा फुकट.’
‘तंबूशेट, माझा आणि पुस्तकांचा काय संबंध? साधा मास्तर माणूस मी.’
‘ख्या… ख्या.. ख्या..! द्या टाळी! भारीच ज्योक मारला बा तुमी. मास्तर, एक काम करा माझ्यासाठी. मला एक पुस्तक लिवून द्या तुमी. आत्मचरित्र…! आपल्या सगळ्या भानगडी घाला त्याच्यात. पार कल्याबाईपासून. यकदम पहिल्या धारेचं… चुरऽऽचुर करणारं आत्मचरित्र व्हायला पाहिजे. सगळ्या दलित आत्मकथा थर्टी एमएलमध्ये वन एटी एमएल पाणी अशा वाटायला पाहिजेत. ए पोर्या, मास्तरचं मागच्या महिन्याचं उधारीचं पान फाडून टाक.’
‘अगं बाई, मास्तरला लिवायचा बी नाद हाये का? कसंकानु बाई. मास्तर! माझ्याबी आयुष्यावर लिवा ना काय तरी. माझं तं काय बाई, सगळं उघडं नागडं आयुष्य हाये…’
आणि थोड्याच दिवसांत मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवून देणारे एकमेकाद्वितीय, अत्यंत दाहक, जोरदार किक मारणारे, पहिल्या धारेइतके कडक आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. ‘माझ्या धंद्याची चित्तरकथा’. सोबतच कल्याबाईच्या बिनधास्त आयुष्याची कहाणी मांडणारं दुसरे पुस्तक प्रसिद्ध झाले, ‘माझ्या बी धंद्याची चित्तरकथा’.
या दोन्ही पुस्तकांनी मराठीच काय संपूर्ण भारताच्या साहित्यक्षेत्रात प्रचंड खळबळ माजवून दिली. आख्खे सारस्वतविश्व ढवळून निघाले. तंबूशेट व त्याचे आत्मचरित्र हे साहित्यविश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी आले. मराठीतील थोर साहित्यिक तंबूशेट यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली.
तंबूशेटने साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि तमाम वृत्तपत्रांनी त्याच्यावर टीकेची एकच झोड उठवली. संमेलनाचा दर्जा कसा घसरला इथपासून काय काय… शोधपत्रकारितावाल्यांनी तर तंबूशेटच्या वैयक्तिक आयुष्याच्या इतिहासाला पार चाळणीच लावली. विशेषतः कल्याबाई हा संदर्भ घेऊन. हा सगळा प्रकार बघून तंबूशेट व मी अगदीच भांबावून गेलो. हे सगळेच प्रकरण आमच्यासाठी नवीन होते. यामागे काही अज्ञात शक्ती काम करत आहेत असा स्पष्ट वास येवू लागला होता. विरोधी उमेदवार तर अगदीच चेकाळल्यासारखा करू लागला व अतिशय खालच्या दर्जाची टीका सुरू झाली होती. आता मात्र शांत राहणे शक्यच नव्हते. मग आम्ही पण आमच्या पद्धतीने गावरान झटका द्यायचा प्लॅन केला. तंबूशेटने सरळ सरळ आव्हान दिले एकाच व्यासपीठावर चर्चेचे. मग तर सामनेवाले आणखीच बिनधास्त झाले. एवढ्या प्रसिद्ध साहित्यिकासमोर हातभट्टीवाला काय टिकणार?
रसिक श्रोतृवृंद, पत्रकार, साहित्य क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला. औपचारिकता आटोपल्यानंतर विरोधी साहित्यिकाने माईक हाती घेतला, ‘येथे जमलेल्या सरस्वती पूजकांनो, महान परंपरा अंसलेल्या मराठी साहित्य संमेलनाला आपण कोणत्या वळणावर आणून ठेवले आहे हे आपण बघताच आहात. हातभट्टीवाले, गलिच्छ चारित्र्य असलेले लोकही या सारस्वतांच्या प्रांगणात गर्दी करून राहिले आहेत. मी म्हणतो, येथे तेल्यातांबोळ्यांचे काय काम? साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे आणि हातभट्टी चालवणे यात फरक आहे म्हंतो मी… तरी माझी आपणास विनंती आहे की मला भरघोस मतांनी निवडून द्यावे.’
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. च्यायला, याने तंबूशेटची चांगलीच पिसं काढली होती. विजयी मुद्रेने विरोधी उमेदवार खुर्चीवर जाऊन बसला.
नंतर तंबूशेट उठला व त्याने माईक हाती घेतला.
‘मंडळी, मी पडलो गावखेड्यातला माणूस. काही चुकलंमाकलं तं पदरात घ्या. पण या पवित्र स्टेजवर बोलताना आमच्या मित्राने जी पातळी सोडली तेच्याने मला लईच वाईट वाटलं. मी सभ्यतेच्या मर्यादा पाळणार होतो पण त्या पाळायच्या नाहीत, असा संकेत त्यांनीच दिला आहे. मला एक सांगा, गेंगाण्या आवाजात शिरा ताणून वरडलं म्हणजे माणूस साहित्यिक होतो असा यांचा समज आहे का? राहिला प्रश्न तेल्यातांबोळ्यांचा. ही यांची जुनीच परंपरा आहे. यांनी माझी जात काढायचं काहीच काम नव्हतं. यांच्या भाषणात कल्याबाई अन हातभट्टीवर लईच जोर होता. यात नवीन काय सांगितलं? अहो हे सगळं तं मीच माझ्या पुस्तकात जाहीरपणे सांगितलंय. आमचं आयुष्य असचे. मोकळंढाकळं. जे हाये ते राजरोस. लपून छपून काहीच नाही, तुमच्यासारखं. काहो राजेहो! मला एक सांगा, अंधार पडल्यावर हाताला गजरा बांधून चौफुल्यावर तुम्ही काय तिथल्या बायांना बाराखडी शिकवायला जाता का? (प्रचंड हशा व अतिप्रचंड टाळ्या). रोज संध्याकाळ झाली की अवटेक पावशेरसाठी कोणाचाही भाट बनून तं नई फिरत ना मी (माफक खसखस). टरबुजासारखे कुल्ले हलवत मिरवलं म्हणजे माणूस साहित्यिक नाही होत राजेहो! साहित्यात काय योगदान आहे हो तुमचे? ‘दै. भुंगा’मध्ये ‘पत्रास कारण की’ या सदरात ‘आमच्या वारडात कचर्याचे प्रचंड ढीग झाले, शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट’ असले लेख लिहून स्वतःला लेखक म्हणून मिरवले आणि फुकटचे सरकारी भूखंड मिळवले आणि माझ्याशी तत्वाच्या गोष्टी करता होय? (दे दणादण टाळ्या). यांची सर्वात मोठी साहित्यसंपदा कोणती? तर एका पेप्रात ‘मानसीताईचा सल्ला’ हे सदर यांनी लिंग बदलून चालवले. (‘हाण तेच्या मायला..’ प्रेक्षकांतून आवाज आणि हशासहित टाळ्या). बरं हे एवढे नामांकित आहेत की यांचं नाव साहित्यरसिकांनी यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरच ऐकलं. चॅलेंजवर सांगतो, यांना यांच्या पुस्तकांचे नाव विचारले तं हे कौन बनेगा करोडपतीतल्या आभिताब बच्चनची लाईफलाईन वापरतील. (हास्याचा गडगडाट). आणखी खोलात गेलोतं पळता भुई थोडी होईल लेको. असो! माझी मायबाप रसिक आणि मतदारांना ईनंती हाये की ह्या गरिबाला सरस्वती मायची शेवा करायची येक संधी द्यावी.’ (दहा मिनिटे टाळ्यांचा कडकडाट आणि कुजबुज)
त्यानंतर मी आणि तंबूशेटने महाराष्ट्र दौरा सुरू केला अन अख्या महाराष्ट्रभर असा खकाना उठवून दिला की बाप रे बाप! यातील मतदारयादीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्लम्बर, फिटर, गवंडी, ठेकेदार… म्हणजे लेखक सोडून असे सगळे लोक होते. तंबूशेट घरात घुसल्या घुसल्या थेट लोटांगणच घालायचा. समोरचा उठवत नाही तोवर पायच सोडायचा नाही. मतदारांचा ऊरच भरून यायचा. ते झालं की,
‘राजाभाऊ, घ्या टावेल टोपी’
मग मी टॉवेल टोपी द्यायचो. मग सत्कार. मग सेल्फी विथ सत्कार. मग आमच्या नासिकच्या द्राक्षाची पेटी, कोंडाजी चिवडा.
‘खास तुमच्यासाठी आठवणीने आणलाय, राजेहो!’
तंबूशेटने अख्खा महाराष्ट्र येडा करून सोडला.
मतदानाची तारीख आली. एव्हाना समोरच्या पार्टीला पराभव स्पष्ट दिसू लागला होता. त्यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मतदान यंत्रांत घोळ होण्याची शक्यता आहे. रीतसर मतदान झाले.
दुसर्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांची हेडलाइन होती,
‘प्रख्यात साहित्यिक तंबूशेट यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.’