‘केक खाने के लिए हम कहीं भी जा सकते है.’
‘दिल चाहता है’ या माझ्या आवडत्या चित्रपटातला हा डायलॉग माझ्या कायम लक्षात राहिलाय. हा डायलॉग आठवला की चेहर्यावर हास्य येतं आणि केकची गोड चव जिभेवर तरळते.
मैदा, साखर, अंडी, बटर आणि बेकिंग पावडर यापासून केक नावाचं मोठं खानदान जन्माला येतं. मैद्याच्या आधी गव्हाचं पीठ असणार. साखरेच्या आधी मध असणार. बेकिंग पावडर आधी यीस्ट असणार. केकमध्ये चीज, फळं, सुके मेवे, लोकल मद्य अशा अनेक अॅडिशन्स होत गेल्या. पण केक हे मुळात लग्नाला, सणासुदीला, विशेष प्रसंगी करायचं साधंसोपं गोडधोड हे ठरलं.
प्रत्येक महिना स्वतःचं एक कॅरेक्टर घेऊन येतो. तसा डिसेंबर महिना आला की केकची आठवण येतेच येते.
लहानपणापासून केक या पदार्थाचं मला अतोनात अप्रूप होतं. एकतर तीसेक वर्षांपूर्वी बेकरीतले पदार्थ सर्रास आणायची पद्धतच नव्हती. तेव्हा मायक्रोवेव्ह घरोघरी नसल्यानं ते पदार्थ घरी करायची माहितीही नव्हती. त्यामुळेच ते पदार्थ गहन आणि अवघड वाटत असतं. क्वचितच जवळच्या हिंदुस्थान बेकरीतून आणलेले कप केक किंवा मॉडर्न बेकरीतून आणलेले क्रीम केक विशेष वाटत. पण वाढदिवसानिमित्त आणला गेलेला केक म्हणजे फारच मोठं अप्रूप वाटायचं.
आता तसे भडक रंगीत आयसिंगचे केक खायची इच्छाच होत नाही.
डिसेंबर महिन्यात ख्रिसमस असतो, त्या निमित्ताने कँप परिसरात फिरणे आणि कयानी बेकरीतला इराणी मावा केक आणणे हे नंतरच्या काळात लागलेले शोध होते. मार्झोरीनमध्ये पाहिलेल्या पेस्ट्रीज म्हणजेच केकच्याच बहिणी असतात. वयानुसार क्रीम केकचं, पेस्ट्रीजचं आकर्षण कमी होऊन साध्या बेसिक स्पाँज केकची आवड निर्माण झाली. पण त्यातही एक केक विशेष आवडता होता, तो म्हणजे आजी आणि आई करत असे तो रवा केक. अंडं खाणं निषिद्ध असणार्या घरात हा रवा केक भलताच आवडता झाला. हा रवा केक आजही कुठल्याही बाहेरच्या केकपेक्षा मला अधिक आवडतो. याच केकची जवळची आवृत्ती नंतर बंगलोर अय्यंगार बेकरीतील रवा केकच्या रूपात भेटली.
रवा केक
साहित्य :
२ वाट्या जाडा रवा
१ वाटी साखर
२ वाट्या गोड ताक
पाव वाटी घरचं पांढरं लोणी
अर्धा टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून खायचा सोडा/ बेकिंग पावडर.
१ टेबलस्पून साजुक तूप.
कृती :
१) लोणी आणि मीठ फेसून त्यात रवा घालावा.
२) त्यात ताक आणि साखर घालून दोन तास ठेवावे. केक बनवताना मिश्रणात सोडा/ बेकिंग पावडर मिसळून घ्यावं.
३) जाड बुडच्या फ्राय पॅनमध्ये तूप लावावे मग हे मिश्रण घालावे.
४) झाकण ठेवून बारीक आचेवर केक भाजावा. भाजताना झाकणावर वजनदार पातेले ठेवावे.
५) साधारण वीसेक मिनिटात खमंग गोड घमघमाट सुटला की केक झाला असे समजायचे.
हा केक गरम असताना खाण्यात अधिक मजा येते.
केकचा इतिहास तर भलताच प्राचीन आहे. भारतात केक १८८३मध्ये केरळमध्ये कन्नूर इथं पहिल्यांदा करण्यात आला. केरळ असल्याने त्यात मग मसाले घालण्यात आले, फळं घालण्यात आली. केक प्रसिद्ध होत गेला. ब्रिटीश राज तर गेलं पण औद्योगिक क्रांतीसोबत खाण्याच्या सवयीत बदल होत गेले. शहरीकरण वाढलं तसं बेकरीज वाढल्या.
केक हा खरं म्हणलं तर एक प्रकारचा ब्रेडच, पण विशिष्ट गोड चव आणि त्याची झालेली असंख्य रूपांतर फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसंच केकचं नातं सेलिब्रेशनशी जोडलं गेलं आहे. एकेकाळी पाव-ब्रेड निषिद्ध असणार्या भारतीय समाजमनात गेल्या वीस वर्षांत केकनं जोरदार शिरकाव करत बस्तान बसवलंय.
एकेकाळी केवळ इंग्रज आणि आंग्लाळलेल्या लोकांची मक्तेदारी असणारा हा महागडा केक हा हा म्हणता म्हणता आता भारतीय समाजाचा भाग झाला आहे. सहज परवडेल असा स्वस्तही झाला आहे. आता तर खेड्यापाड्यातही केकशिवाय वाढदिवस साजरा होत नाही. आता कुठल्याही खेडेगावात लहानशी बेकरी असतेच. इलेक्ट्रिक ओव्हन, उत्तम बारीक मैदा आणि बेकिंग पावडर आल्यापासून बेकिंग प्रोसेस अधिक सोपी झाली आहे. सोपे पदार्थ नेहमीच झपाट्यानं पसरतात. लोकप्रिय होतात.
मूळात साधा बेसिक स्पाँज केक करणं अजिबात अवघड नाही. बेकिंग म्हणजे ठोक गणित आहे प्रमाणाचं आणि पदार्थांमध्ये हवा भरण्याचं.
बेसिक पाऊंड केक म्हणजे चार मूळ पदार्थ; मैदा, साखर, बटर, अंडी समप्रमाणात घेऊन केक भाजणं. पाउंड केक म्हणजे चार मूलभूत घटक एकेक पाउंड घेऊन केक करायचा. आपण ग्रॅममध्ये घेऊनही करू शकतो. इथं वाटीचं प्रमाणही घेतलेलं चालेल, पण शक्यतो ग्रॅममध्ये मोजून केक केलेला बरा असतो. मग केक बिघडायची आणि चुकायची संधी नाही.
पाऊंड केक
साहित्य :
बटर, साखर, मैदा आणि अंडी प्रत्येकी २५० ग्रॅम
बेकिंग पावडर – १ टीस्पून
व्हॅनिला इसेन्स – १ टीस्पून.
कृती :
१) बटर आणि साखर फेसून घेणे.
२) अंडी एकेक करत फोडून त्यात घालून फेसणे.
३) व्हॅनिला इसेन्स घालणे.
४) मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घेऊन हळूहळू वरील मिश्रणात घालणे. कट आणि फोल्ड पद्धत वापरून मिश्रण एकजीव, गुठळ्यारहित करायचं.
५) ओव्हनमध्ये १६० ते १८० अंशाला ३०-४० मिनिटं बेक करणे. मायक्रोवेव्ह असेल तर अर्थातच कमी वेळात केक होतो. ते टायमिंगचं गणित प्रत्येक मायक्रोवेव्ह आणि केकच्या प्रमाणानुसार बदलत राहतं.
तसं तर आता कुकरमध्ये, अंड्याशिवाय, साखरेशिवाय, बटरशिवाय, मैद्याशिवाय अशी केकची अनेक रूपं आलेली आहेत. आपल्याला आवडतील, तब्येतीला आणि खिशाला मानवतील तशी ती केली जातात. मग मैद्याच्याऐवजी कणीक येते, अंड्याऐवजी दही येतं, बटरऐवजी रिफाईंड तेल येतं, साखरेऐवजी खजूर/गुळ/मध येतात. पण बेकिंग पावडरला मात्र पर्याय नाही. त्याशिवायचा केक म्हणजे नुसता भाजलेला कणकेचा दगडी गोळा होईल.
आईस्क्रीम केक
आईस्क्रीम केक नावाचा एक गंमतीशीर जुगाड केक मी करून पाहिला होता. रोस्टेड आमंड (भारतीय उच्चार आल्मंड) आईस्क्रीमपासून केलेला हा केक मस्त झाला होता. तसा कुठल्याही आईस्क्रीमपासून करता येईल.
साहित्य :
तीन वाट्या रोस्टेड आमंड आईस्क्रीम, दीड वाटी मैदा, बेकिंग पावडर एक टीस्पून, मीठ चिमूटभर.
कृती :
१) तीन मोठ्या वाट्या रोस्टेड आमंड आईस्क्रीम रूम टेंपरेचरला आणून वितळून घ्यायचं.
२) त्यात दीड वाटी मैदा, एक टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ घालून फेटून घ्यायचं.
३) कमी गोड वाटल्यास साखर हवी तर घालू शकता. मी घातली नाही.
४) मायक्रोवेव्हमध्ये सात मिनिटं केक बेक करायचा.