शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेच्या स्थापनेपासून वाटायचे. परंतु दलित पुढारी आणि जनता यांच्यासमोर शिवसेना जातीयवादी असल्याचे भूत तेव्हा काँग्रेसने सारखे नाचवले. महाराष्ट्रातल्या या दोन प्रबळ शक्ती एकत्र आल्या, तर आपले काय होणार, याची भीती काँग्रेसला होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही काँग्रेस्विरोधात होते. ‘काँग्रेस हे जळते घर आहे,’ असे ते दलितांना-बौद्धांना सांगायचे. परंतु डॉ. आंबेडकरांच्या नावाने पक्ष चालवणार्या दलित पुढार्यांनी तिथे दुर्लक्ष केले. नामांतरविरोधी आंदोलन आणि रिडल्स प्रकरणात शिवसेना आघाडीवर होती, असा आरोप तेव्हा काँग्रेसच्या वळचणीला गेलेल्या दलित पुढार्यांनी केला होता, हा गैरसमज पसरवला होता. परंतु नंतर काही वर्षांनी हा गैरसमज दूर झाला. नामांतरविरोधी आंदोलनात शिवसेना नव्हती, तर काँग्रेस आणि आत्ताच्या राष्ट्रवादीचे नेते होते, असे स्पष्ट प्रतिपादन रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केले. त्यामुळे उशिरा का होईना, शिवसेनेविषयी असलेले गैरसमज दूर झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसविषयी मते काय होती याची आठवण बाळासाहेबांनी ‘मार्मिक’च्या ७ मार्च १९७१ अंकात ‘नवबौद्ध पुढार्यांना डॉ. आंबेडकर समजले आहेत का?’ या अग्रलेखाद्वारे केली होती. शिवशक्ती-भीमशक्ती तेव्हापासून कायम एकत्रित राहिली असती, तर आज महाराष्ट्रात वेगळे चित्र दिसले असते.
शिवशक्ती-भीमशक्ती युती सर्वप्रथम १९७३ साली झाली होती. या सालाच्या सुरुवातीला झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे होते की शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. या युतीचे शिवसेनाप्रमुखांनी मनापासून स्वागत केले. ‘मार्मिक’च्या पहिल्या पानावर व्यंगचित्र काढून शिवसेना-रिपाइं परस्परांचा हात एकमेकांच्या हातात घेत आहेत असे दाखविले होते आणि शिवशक्तीला आज भीमशक्ती येऊन मिळत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला होता. ही शक्ती केवळ मुंबई राजधानीचेच नव्हे, तर सार्या महाराष्ट्राचे चित्र पालटून टाकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केला होता. पहिला पाडाव मुंबई काँग्रेसचा आणि नंतर ही वज्रमूठ दलित बांधवांवर होणार्या अत्याचारावर, अन्यायावर तुटून पडेल, असा विश्वास त्यांनी दिला होता.
एका जाहीर सभेत शिवसेनाप्रमुखांनी सांगितले की, पददलितांवर यापुढे जेथे जेथे अत्याचार होतील, तेथे तेथे पाचशे शिवसैनिक आणि पाचशे रिपब्लिकन सैनिक असे युतीचे एक हजार सैनिक जातील व अत्याचार करणार्या यंत्रणेचा चक्काचूर करतील. या युतीमुळे मराठी रक्त एक होत आहे. तसेच रिपब्लिकनांतील खोब्रागडे व गायकवाड गट एकत्र आले आहेत. आमची रिपब्लिकनांची युती व्हावी अशी माझी शिवसेनेच्या जन्मापासून इच्छा होती. पक्षापक्षात मराठी माणूस फाटून गेलाय. तो एकत्र यावा या दृष्टीने ही युती मला आवश्यक वाटत होती. ही युती केवळ दोन पक्षांची नाही. रिपब्लिकन हे सामाजिक दलित आहेत तर आम्ही राजकीय दलित आहोत. अशा संघटनांची ही युती आहे.’’
निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला ३९ जागा मिळाल्या, तर रिपब्लिकन पक्षाला फक्त एक जागा मिळाली. परंतु या निमित्ताने एकमेकांविरुद्ध लढणारे दोन लढवय्ये मराठी पक्ष एकत्र आले, ही गोष्ट मात्र महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात विशेष नोंद घेण्यासारखी ठरली.
दरम्यान, जनता पक्षाची राजवट येऊन गेली. काही रिपब्लिकन नेत्यांना जनता पक्ष जवळचा वाटू लागला, पण त्यांचा अल्पावधीतच भ्रम दूर झाला. नंतर महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन दलितांचे प्रश्न दणदणीतपणे सोडवणार आहे, असे बाळासाहेब ठाकरे आणि दलित पँथरचे नेते, कवी नामदेव ढसाळ यांनी परळ येथे जाहीर सभेत सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण ३५ जागा शिवसेना व दलित पँथर एकत्रित लढविणार अशी घोषणाही त्यांनी केली. या ३५पैकी २५ जागा मुंबईतील असतील असे त्यांनी सांगितले. मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना आणि दलित पँथरचे एकत्रित संमेलन घेण्यात आले. यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘‘तुमच्यातील दलित बाजूला काढा आणि मराठी माणूस म्हणून जगा. नुसते दलित म्हणून जगू नका. मी जात मानत नाही. मी जातीविरुद्ध बंड करणार आहे. तुम्ही दलित असा, ब्राह्मण असा नाहीतर आणखी कोणी असा, या मराठी मातीत जन्मलेला माणूस ‘मरगठ्ठा’ असला पाहिजे.’’
वेळोवेळी शिवसेनाप्रमुखांनी केलेली शिवशक्ती-भीमशक्तीची एकजूट सत्ताधार्यांना पाहवली नाही. रिपाईंच्या नेत्यांना कधी भडकवून तरी कधी सत्तेचे गाजर दाखवून शिवसेनेपासून दूर केले गेले. ८०च्या दशकातील मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा आणि रिडल्स प्रकरणावरील बाळासाहेबांची मते तोडून-मोडून सांगून दलित समाजाला शिवसेनेविषयी मन कलुषित करण्याचा प्रयत्नही झाला. मराठवाडा नामांतर प्रश्नावरील मराठवाड्यातील जनतेची भूमिकाच बाळासाहेबांच्या तोंडी भाषणातून येत होती. परंतु बाळासाहेब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरविरोधी आहेत, राखीव जागांविरुद्ध आहेत, असा त्याचा अर्थ लावून दलितांची माथी भडकवली जात होती.
काही दलित नेत्यांचा तोल ढासळून ते बाळासाहेबांवर अपशब्दांत टीका करीत होते. ऑगस्ट १९८२मध्ये एका प्रक्षोभक भाषणात दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांनी ‘तुळशीच्या बागेत भांगेचा जन्म घेतलेल्या या द्वाड कार्ट्याला (बाळासाहेबांना) गोळ्या घालून ठार मारले पाहिजे,’ असे उद्गार काढले. त्यानंतर मग हेच नामदेव ढसाळ बाळासाहेबांना मातोश्रीवर भेटण्यास गेले. तेव्हाच्या चर्चेत बाळासाहेबांचे दलित समाजाविषयीचे स्पष्ट विचार ऐकून, प्रेम पाहून आणि एकूणच बाळासाहेबांचा स्वभाव पाहून ढसाळ बाळासाहेबांच्या प्रेमात पडले आणि बाळासाहेबांचे दोस्त बनले. ही दोस्ती दोघांनीही शेवटपर्यंत निभावली. निवडणुका असो अथवा नसो, शिवसेना आणि दलित पँथर यांची युती आजही टिकून आहे. कवी साहित्यिक असलेले नामदेव ढसाळ हे बरीच वर्षे दैनिक ‘सामना’मध्ये दर शनिवारी ‘सारे काही समष्टीसाठी’ हे सदरही लिहित होते.
शिवसेनाप्रमुखांना शिवशक्ती-भीमशक्ती युती कायम राहावी असे वाटायचे, परंतु रिपब्लिकन पक्षात अनेक गट-तट असल्यामुळे काही गट सत्ताधार्यांच्या वळचणीला गेले तर काही कायम विरोधात राहिले. सत्ताधार्यांनी आणि विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यातील फुटिरतेचा राजकारणासाठी वापर केला. राजकीय सोय पाहून निवडणुकीच्या वेळी जवळ केले. परंतु शिवसेनेने असे कधीच केले नाही. उलट शिवसेनेने संघटनात्मक पदाधिकारी नेमताना किंवा निवणुकीत तिकीटवाटप करताना जात-पात कधीही पाहिली नाही.
शिवशक्ती-भीमशक्ती युती व्हावी ही शिवसेनाप्रमुखांची सुरुवातीपासूनची इच्छा होती. वेळोवेळी आंबेडकरी जनतेला त्यांनी यासाठी आवाहन केले होते. परंतु तेव्हा दलितांनी त्यांचे ऐकले नाही. किंबहुना शिवशक्ती-भीमशक्ती युती होऊ नये म्हणून विरोधकांनी खोडा घातला.
२०१० साली मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि रिपाइं नेते रामदास आठवले एकत्र आले असता आठवले म्हणाले की, उद्धवजी, तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहात. परंतु मी प्रबोधनकारांचा वैचारिक नातू आहे. तेव्हा हाच धागा पकडून उद्धवजी म्हणाले, प्रबोधनकार आणि आंबेडकर यांनी एकत्रितपणे दलितांविरोधी लढा दिला. तुम्ही प्रबोधनकारांचे वैचारिक नातू आहात तर आपल्यात दुरावा का? चला आपण एकत्र येऊया. महाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीने समाज परिवर्तन करू या. तेव्हापासूनच आठवल्यांच्या मनात युतीचे विचार येत होते. असे एका कार्यक्रमात आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन नेत्यांचा सत्ताधारी पक्षाबरोबर केलेल्या युतीचा भ्रमनिरास झाल्यामुळे पुन्हा शिवसेनेशी जवळीक केली. २३ जानेवारी २०११ रोजी बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सहकार्यांसह बाळासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यावेळी बाळासाहेबांनी शिवशक्ती-भीमशक्ती युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. रिपाइं नेत्यांनी बाळासाहेबांच्या इच्छेचा मान राखला, आवाहनाला प्रतिसाद दिला. मग शिवशक्ती-भीमशक्ती युती होण्याच्या दिशेने त्यांची पावले पडत गेली. आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रात पसरलेल्या रिपाइं कार्यकर्त्यांच्या आणि आंबेडकरी जनतेच्या मनातही युती व्हावी असेच जाणवले. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांची भेट घेतली. भ्रष्टाचार, शासनातील घोटाळे, महागाई, दलित अत्याचार या मुद्द्यांवर महाराष्ट्रात काँग्रेस आघाडी विरोधात शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र आली आहे.
२०१२ ते २०१९पर्यंत आठवले हे शिवसेनेबरोबर होते. २०१९मध्ये शिवसेना-भाजपा युती तुटली. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. भाजपाने आठवले यांना केंद्रात मंत्री केले होते. त्यामुळे आता ते त्यांच्याबरोबर आहेत.
जून २०२२मध्ये भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत ़फूट पाडली आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सुसंस्कृत, सुशिक्षित, सोज्वळ प्रतिमा असलेल्या उद्धव यांना ज्या तर्हेने मुख्यमंत्रीपद सोडावे लागले ते पाहून शिवसैनिकच नव्हे, तर महाराष्ट्रातील जनता हळहळली. भाजपा आणि शिंदे गटाविषयी चीड निर्माण झाली. सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत होता. महाराष्ट्रात यापूर्वी असे घडले नव्हते. पण भाजपाच्या घरफोड्या भूमिकेने हे घडले. भाजपने सत्तेसाठी सर्व मर्यादा सोडल्या. थोड्याच दिवसात महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे हे चित्र दिसू लागले, उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळू लागला. भाजपा विरोधात उद्धव यांचे हात बळकट करण्यासाठी छोट्या दलित संघटना, गट पुढे आले आणि पाठिंबा जाहीर केला.
आता महाराष्ट्रात लवकरच शिवशक्ती-भीमशक्ती युती पुन्हा झाल्याने सामाजिक व राजकीय परिवर्तन घडून येईल असे शिवसैनिकांना आणि भीमसैनिकांनाच नव्हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला वाटते.