मेरे दुश्मन समझ रहे थे मैं अब कभी लौटके ना आऊंगा, एक गुमनामी का समंदर है उसी में डूब जाऊंगा।
शाहरुख खान हे नुसतं एक नाव नसून ९०च्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान होतं… हे सांगणारं की जर तुम्ही पुरेशी मेहनत केली आणि तुमच्यात पुरेशी आग असली तर तुम्ही जग जिंकू शकता. याचं जिवंत उदाहरण होता शाहरुख खान, द किंग खान.
तीस वर्षं इंडस्ट्रीवर राज्य केल्यानंतर हळूहळू शाहरुखच्या करिअरला उतरती कळा लागली. देशात राजकारणाच्या बदलत्या वार्यांनी शाहरुखच्या विरोधात एक फळी उभी राहिली. कोण जाणे का? पण त्याला कडकडून विरोध व्हायला लागला. त्याच्या सिनेमांचा दर्जाही खालावला. आणि काही चांगले सिनेमेही आपटले. चार वर्षांपूर्वी ‘झिरो’ सिनेमा करून झिरो झालेला शाहरुख कोशात गेला, हा फेज माझ्यासारख्या तरुणांसाठी काहीसा निराशाजनकच होता. कारण शाहरुख एक व्यक्ती नसून एक स्वप्न आहे. जे सगळ्या देशाने पाहिलं, साकारलं. त्याने गेली तीस वर्षं या देशाला एकत्र आणण्याचं काम केलं आहे. त्याचा पाडाव होताना पाहणं त्रासदायक होतं. परंतु प्रत्येक चांगली गोष्ट कधी ना कधी संपुष्टात येते. शाहरुखच स्टारडम ही ती चांगली गोष्ट होती, असा स्वीकार नाईलाजाने का होईना, माझ्यासारख्या लोकांना करावा लागला.
गेल्या दोनेक वर्षात तर संपूर्ण हिंदी फिल्म इंडस्ट्रीलाच मरगळ आली. सगळ्या मोठ्या स्टार्सच्या फिल्म एकामागोमाग एक आपटल्या आणि आता ही इंडस्ट्रीच बंद पडण्याच्या मार्गावर आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला. अतिशय शक्तिशाली समजली जाणारी बॉलिवुड नावाची इंडस्ट्री तुकडा तुकडा होऊन विखरत चाललीये असं वाटायला लागलं होतं.
अभी बाकी मेरी कहानी है
सारी दुनिया को जो सुनानी है।
शाहरुखच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर येतो काय, त्यात एका हीरोइनने घातलेल्या बिकिनीच्या रंगावरून विनाकारण वाद उपस्थित होतो काय, शाहरुखचा कमबॅक होण्याच्या आधीच तो हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि आजकालच्या कलुषित वातावरणात ही फिल्म पाडली जाऊ शकते ही काही अशक्यातली गोष्ट नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वी फिल्म रिलीज झाली आणि तिला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय त्याने परत एकदा भारतीयांचं डोकं ठिकाणावर आहे यावर शिक्कामोर्तब केलं.
किंत्सुगी
सिनेमात अब्बास टायरवालाने लिहिलेल्या काही सुंदर संवादांपैकी एकात किंत्सुगी नावाच्या कलेचा उल्लेख आहे, ज्यात फुटलेल्या वस्तूंना सोन्याची कल्हई करून दुरुस्त केलं जातं… ते सोनं दुसरं कोणी नसून पठाण आहे, असा एक संवाद आहे. हा संवाद मला योगायोग बिलकुलच वाटत नाही. विखुरलेल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीला पुनरुज्जीवित करण्यासाठी, जात-धर्माच्या नावावर विभक्त झालेल्या जनतेला परत एकदा हिंदू किंवा मुस्लिम न म्हणवून घेता फक्त सिनेमाचा फॅन म्हणून एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातील दुरावा नष्ट करण्याचं काम करण्यासाठी ज्या सोन्याची गरज होती ते सोनं शाहरुख आहे, हे ही फिल्म अनअपॉलॉजिटिकली सांगण्याचा प्रयत्न करते आणि आतापर्यंत हातात आलेल्या आकड्यांवरून हे स्टेटमेंट किती खरं आहे याची प्रचिती येते. कारण सिनेमा नेहमीपासूनच चार लोकांनी सोबत येऊन आनंद घेण्याचंच साधन होतं. पण गेल्या काही वर्षात जातीय राजकारणाने सिनेमे बॉयकॉट करणार्यांची एक जमात जन्माला आलीये जी कुठलाही नवा सिनेमा आला की येनकेन प्रकारे तो बॅन करण्याच्या प्रयत्नात असते. पण ‘पठाण’समोर त्यांनाही गुडघे टेकावे लागले याचा असुरी आनंद आहे मला.
‘पठाण’ ही जेम्स बॉण्ड टाइप फिल्म नसून ‘मिशन इम्पॉसिबल’ किंवा ‘फास्ट अँड फ्युरियस’च्या धाटणीची फिल्म आहे. कारण बॉण्ड फिल्म्स हा एक अतिशय गंभीर जॉनर आहे आणि आपल्याकडे संपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज तयार करण्यासाठी ‘मिशन इम्पॉसिबल’ किंवा ‘फास्ट अँड फ्युरियस’चाच टेम्प्लेट योग्य आहे. सिद्धार्थ आनंदने ‘वॉर’मध्ये केलेल्या चुका इथे सुधारल्या आहेत. फिल्मची लांबी कमी आहे आणि अॅक्शनवर जोर दिलेला आहे. व्हीएफएक्स आणखी थोडे चांगले होऊ शकले असते.
चार वर्ष आराम केलेला शाहरुख पठाणमध्ये नवसंजीवनी घेऊन प्रâेश झाल्यासारखा वाटतोय. त्याचं काम अगदीच सहज सुंदर आणि धडाकेबाज झालंय. जुना शाहरुख परत आलाय. शाहरुखइतकंच क्रेडिट द्यायला हवं जॉन अब्राहमला. कमी क्वांटिटीत तो फार सुखावतो. त्याला कशा प्रकारे आणि किती प्रमाणात वापरलं पाहिजे याचं पठाण एक उत्तम उदाहरण आहे. त्याला जितका स्क्रीन टाइम मिळालाय, त्यात त्याने भाव खाल्लाय. दीपिका पदुकोणमध्ये अॅक्शन सीन्स करतानाचा ग्रेस, एनर्जी किंवा इंटेन्सिटी नसते आणि मिस्टरी किंवा ड्रामासुद्धा तिच्या अभिनयातून येत नाही. तिच्या वाट्याला आलेलं काम तिने ठीक निभावलंय. भारत अजूनही एका फिमेल अॅक्शन स्टारची प्रतीक्षा करतोय. डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांनी अपेक्षेप्रमाणे चांगलं काम केलंय.
आपला सिनेमॅटिक युनिव्हर्स उभा करणे हे वाटतं तितकं सोपं नाहीये. रोहित शेट्टीच्या फिल्म्समध्ये अनावश्यक येणारी कॉमेडी किंवा ट्रेलरमधूनच दाखवून दिले जाणारे कॅमिओ हेच दर्शवतात. पठाणमध्ये मात्र या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. कुठेही आळशीपणा किंवा उगाच एखादा रेफरन्स घुसवायचा म्हणून घातलेला दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण आहे. कथा एकंदरीत अशा पद्धतीने लिहिली आहे की सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. अगदी सुरुवातीला येणारा इंट्रो सीनसुद्धा फक्त नायकाची एन्ट्री करण्यासाठी वापरलेला नसून तो ज्या व्यक्तीला पकडतो त्याचा कथानक पुढे नेण्यासाठी वापर होतो. जॉन अब्राहम व्हिलन का आहे, याची कारणावली इंटरेस्टिंग वाटली. त्यावर पठाणचा रिस्पॉन्ससुद्धा जस्टीफाईड वाटला.
तो या घटनेकडे एक माणूस म्हणून कशा पद्धतीने पाहतो हे त्या एका संवादातून चांगल्या प्रकारे बाहेर आलं. नाहीतर अशावेळी नायकाचा बॉय स्काऊट होण्याची जास्त शक्यता असते. त्या एका दृश्यामुळे दोन्हीही पात्रांना एक विशिष्ट खोली मिळाली.
सेकंड हाफमध्ये फिल्म वेगळाच गेअर पकडते. सेकंड हाफ अतिशय रोचक झालाय. आणि जे शेवटचं थ्रेट आहे त्याला टिकिंग बॉम्ब टाईप इफेक्ट अॅड करण्यात एक सेन्स ऑफ इमर्जन्सी देण्यात सिद्धार्थ आनंद यशस्वी ठरलाय. क्लायमॅक्स
अॅक्च्युली स्केलच्या बाबतीत मोठा वाटतो आणि फिल्मसुद्धा जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या लोकेशन्सवर घडते. याने फिल्मला एक सेन्स ऑफ स्केल येतो. बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये अंकित आणि संचित बल्लारा या जोडीने बाजी मारली आहे. या फिल्मचं अर्ध यश बॅकग्राऊंड स्कोरमध्ये लपलेलं आहे. पठाणची, जिमीची थीम किंवा या युनिव्हर्समधल्या इतर पात्रांच्या थीम्स यांचा सुरेख पद्धतीने वापर केलेला दिसतो. सिनेमॅटोग्राफी व अॅक्शन डिझाईनसुद्धा चांगलं आहे.
सेकंड हाफमधला कॅमिओ सीन धमाल झालाय. आणि शेवटाकडे घडणारा एक इमोशनल सीन परिणामकारक झालाय. फिल्ममधले ट्विस्ट फार अनप्रेडिक्टेबल नसले तरी ते जेव्हा वर्क करतात तेव्हा एक आनंद होतो. पठाण ग्रेट फिल्म नसली तरी पैसा वसूल आहे. आणि या युनिव्हर्समध्ये पुढे ज्या गोष्टी होणार आहेत त्या नक्कीच उत्कंठावर्धक आहेत.
आमच्या शाहरुखचा सिनेमा नकारात्मक लोकांच्या नाकावर टिचून जोरात धंदा करत आहे, किंत्सुगी नावाची सोन्याची कल्हई ठरत आहे यापेक्षा मोठा आनंद नाही. पठाण इज एक्झॅटली व्हॉट दी डॉक्टर इज ऑर्डर्ड. फुल्ल पैसा वसूल. दी किंग इज बॅक!