परवा एका व्यावसायिक ग्रुपवर एकजण चौकशी करत होते की पोळीचा तयार गूळ कुठे मिळेल? नेहमीच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी त्यांना सांगितले म्हणे की आम्ही फक्त संक्रांतीच्या दरम्यान ठेवतो पोळीचा गूळ. मग बरीच चर्चा सुरू होती की इतरवेळी सहजासहजी का नाही मिळत तयार गूळपोळी किंवा गूळ वगैरे. आपल्या पारंपरिक पदार्थांना ऋतुमानानुसार पानात मानाचं स्थान मिळालेय. गुळाची पोळी संक्रांतीच्या वेळी म्हणजे थंडीत शरीराला आवश्यक ती उष्णता देते म्हणून मुख्यतः तेव्हाच खाण्याची पद्धत आहे. त्याही पलीकडे घरीच बनवा की गूळ… सोप्पं तर आहे, वगैरे अनाहूत सल्ले पण त्यांना मिळाले. अर्थात प्रश्नकर्त्यांनी पुढे नेमके काय केले हे काही समजले नाही!
अनेकांच्या सुगरणपणाची कसोटी बघणारा आहे नाही का हा पदार्थ?कृती म्हटली तर सोपी आहे, पण अनेक व्यवधानं पाळावी लागतात बरं. साधा मऊ व पिवळाधमक गूळ कोरड्या किसणीवर किसून घ्यायचा सर्वात आधी. मग गुळाच्या साधारण पाऊणपट बेसन थोड्या तेलावर खमंग भाजायचे. गोडाच्या पदार्थात तुपाऐवजी तेल? त्यामागे पण शास्त्र आहेच की! तूप थिजतं व सारण कडक होतं म्हणून तेल. आवडीनुसार कमी-जास्त तीळ, सुक्या खोबर्याचा कीस व खसखस भाजून त्याची अर्धबोबडी पूड करायची. गार झालेलं बेसन, ही भरड व किसलेला गूळ एकत्र करून त्यात कणभर मीठ व वेलदोड्याची व जायफळाची पूड घालून सगळं छान मिसळून घ्यायचं. अगदी एकजीव झाला पाहिजे सारणाचा गोळा. हा गोळा आठवडाभर सहज टिकतो, एकदम जरा जास्त केला तरी वेळेवर हव्या तेवढ्या पोळ्या करता येतात. पोळी फुटून गुळ बाहेर येऊ नये म्हणून या सारणात अगदी तूरडाळीएवढा खायचा चुनापण टाकतात काहीजण. वरच्या पारीसाठी चाळलेली कणीक आणि मैदा समप्रमाणात घेऊन त्यात मीठ व कडकडीत तेलाचं मोहन घालावं नी निरश्या दुधाने घट्ट गोळा मळून घ्यावा. सारण व पारीचा गोळा सारख्या प्रमाणात घट्ट असणं ही एक महत्वाची गोष्ट असते. पारीचे लहान गोळे करून छोट्या चांदक्या लाटाव्यात आणि दोन चांदक्याच्या म्हणजे लहान पोळ्यांच्या मध्ये सारणाचा गोळा ठेऊन पातळ पोळी लाटावी. अगदी कडेपर्यंत सारण सहसा जात नाही म्हणून कातण्याने बाजूचा भाग कापून टाकावा. पोळी भाजण्यासाठी तवा सणसणीत तापलेलाच हवा. गूळ विरघळून पारी फोडून बाहेर आला नाही म्हणजे पोळी जमली! मात्र गूळ आलाच बाहेर तर पुढची पोळी टाकण्यापूर्वी तवा ओल्या सुती कापडाने पुसायला विसरायचं नाही बरं!! एकदा पोळी दोन्ही बाजूने छान भाजली गेली की सरळ राहील अशी ठेवायची. गार झाली की तुपाच्या गोळ्याबरोबर फस्त करायची. इतर पदार्थांसारखा गरम खाण्याचा सोस केला तर खाणार्याची जीभ पोळलीच म्हणून समजा!! गूळ एवढा गरम असतो की सहन नाही होत जिभेला. हाच गूळ बाहेर आला की पोळीचंही रंगरूप बिघडवतो नाही का? नितळ चेहर्यावरच्या डागांप्रमाणे पोळीला शोभत नाहीत हे गुळाचे डाग. मात्र नुसत्याच आवरणाला तर काही अर्थ नाही, म्हणजे गुळाशिवाय पोळी शक्य नाही, पण तो तप्त गूळ शांत होईपर्यंत आवरणातच राहिलेला पोळीबरोबरच खाणार्यासाठीही श्रेयस्कर ठरतो! आपल्या तमाचेही असेच असते नाही का?
रज, तम व सत्व या गुणांच्या मेळावरच आपली मनोभूमिका ठरते. प्रत्येकच गुणाचे अस्तित्व सर्वांत असतेच, मात्र प्राबल्याचे प्रमाण कमी अधिक असते. सात्विक संताप वगैरे कितीही गोंडस नाव दिले तरीही तमोगुणाचा, संतापाचा सर्वात मोठा तोटा आपल्यालाच सहन करावा लागतो. समोरचा तर दुखावतोच, पण आपलेही मन कटू होते या रागाने. काही कारणाने अगदी राग आलाही, तरी तो ताबडतोब व्यक्त न करणंच फायद्याचं असतं नाही का?
गरम गुळाचा चटका खाणार्याला, तर डाग पोळीलाच पडतो तसंच अगदी. एकदा का राग शांत झाला की तोच मतभिन्नतेचा मुद्दा शांतपणे सांगितला तर समोरच्याला पटण्याची शक्यता कैकपटीने वाढते. आपला मुद्दा कितीही बरोबर असला तरी त्या क्षणिक संतापापायी आपण त्याचे महत्त्व कमी करतो. बरेचदा हा राग हे आपल्या संभाषणशक्तीच्या कमकुवततेचे लक्षण असते, शांतपणे व सामंजस्याने केलेली चर्चा कायमच सुफल होते.
माताजी श्री सारदादेवी वारंवार सांगतातच की, कितीही सत्य असले तरी कटू बोलू नका. ती कटूता दुधारी ठरते. नात्यांबरोबरच त्या दोन्ही मनांनाही दुखावते. थंड झालेली गुळपोळी जशी आबालवृद्ध आवडीने व चवीने खाऊ शकतात तसंच या परिस्थितीचंही असावं, आपल्या सारासार विवेकाने आवरणाचं काम करून त्या तप्त तमाला आतच निववावं नी नंतर सुयोग्यपणे मुद्दा मांडावा. मुरलेल्या गुळपोळीसारखाच तो मुद्दा समोरच्याला आवडेल याची पक्की खात्री तेही कोणत्याही कटुता व हानीखेरीज… हेच हवं असतं नाही का माणसाला प्रगल्भतेचा पुढचा टप्पा म्हणून?