महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल म्हणून खुशीत गाजरे खात असलेले माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना ना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ना राज्य मंत्रीपद. त्यामुळे मंत्रीपदासाठी हपापलेल्या भुजबळांसारखेच तेही हवालदिल झाले हे खरं असलं तरी त्यांच्यापेक्षा माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हवालदिल झाला. माझ्याशी पोक्या एवढंच बोलला की, भुजबळांना मंत्रीपद मिळालं नाही हे मी समजू शकतो, पण केसरकरांसारख्या सभ्य, सुसंस्कृत व केसरकर यांना ते कसंही करून मिळायलाच हवं होतं. तेव्हा मी पोक्याला म्हणालो, केसरकरांना मंत्रिमंडळाच्या बाहेरच ठेवलं त्याला काहीतरी मोठं कारण नक्कीच असणार. सध्या तरी ते मोकळेच आहेत. त्यामुळे तू कोकणात त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं दर्शन घे. तसंच त्यांची खास मुलाखत घेऊन परत ये. पोक्याने कामगिरी फत्ते केली. तीच ही मुलाखत. मात्र मुलाखतीची टेप वाजवण्यापूर्वी मी त्याला विचारलं की, तू त्यांच्या आलिशान निवासस्थानी गेलास तेव्हा ते भुजबळांसारखे संतप्त दिसत होते की शांत दिसत होते? त्यावर पोक्या म्हणाला, मी गृहप्रवेश केला तेव्हा ते दरवाजाकडे तोंड करून समाधीस्थ अवस्थेत मला एखाद्या सत्पुरुषासारखे दिसले. माझी चाहूल लागताच एक डोळा किलकिला करून म्हणाले, ये वत्सा ये. तू येणार याचे संकेत मला तुझी एस.टी. महाडला असतानाच मिळाले होते. त्यामुळे तुझी खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था करूनच मी ध्यान लावून बसलो. तेव्हा तू नव्या वर्षाचं सेलिब्रेशन मुलाखतीच्या पूर्वरंगात पिता पिता केलंस तरी चालेल. तेव्हा आपण आता सुरू होऊया…
– केसरकरजी, तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळात घेतलं नाही हे समजल्यावर तुम्हाला शॉक नाही बसला?
– मुळीच नाही. मी बालपणापासून आतापर्यंत माझ्या जीवनात एवढे चढउतार पाहिले आहेत की, तेवढे आमच्या दाढीधारक सर्वज्ञ उदयजी सामंत यांनीसुद्धा पाहिले नसतील. कोकणातल्या निसर्गरम्य डोंगरदर्यातून मी जेवढं ट्रेकिंग केलंय तेवढं कुणीच केलं नसेल. मी निसर्गाच्या एवढा जवळ गेलोय, त्याच्याशी एकरुप झालोय की निसर्गातच मी देव पाहिला आणि तो माझ्या शरीरात कधी भिनला ते मला समजलंच नाही. आज तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे. तुला नाही समजणार ते. तू अजून विद्वान उदय सामंतांइतकाच बच्चा आहेस.
– तुम्ही सारखं त्या उदय सामंतांचं नाव का घेता? अजित पवारांसारखी तुमच्या मार्गातील धोंड नव्हती ना ती?
– तुला काय सांगू वत्सा! या गोष्टी तुझ्या आकलनशक्तीच्या पलीकडच्या आहेत.
– तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी डावललं तेव्हा शिंदे साहेबांनी तरी सीएमकडे तुमची वकिली करायला हवी होती.
– त्यात शिंदे साहेबांची काहीच चूक नाही. त्यांना स्वत:ची वकिली करताना त्यांचे काय हाल झाले ते आपण सर्वांनी पाहिलंय. त्यांचा काहीच दोष नाही.
– मग तुमच्यासारख्या संतसज्जन माणसाच्या वाटेत कोणी अडथळे निर्माण केले?
– मी कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही. पण माझ्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मला त्या बाराजणांचे चेहरे डोळे बंद केले तरी दिसत होते.
– त्या बारभाईंना तुमच्या मार्गात आडवं येण्याचं काय कारण होतं?
– काहीच नाही. पण कसं असतं पोक्या, असे विघ्नसंतोषी लोक कुणाचंही नेहमीच वाईट चिंतत असतात. मला अशा लोकांची कीव येते. हाथी चलत है अपनी चाल, कुत्ता भुकतवा भुकने दे’ असं मानून मी दुर्लक्ष करतो. मला जी संधी द्यायची ती साईबाबाच देतील, यावर माझा विश्वास आहे. माझ्या मंत्रीपदाच्या काळात माझ्याएवढी प्रचंड कामं कुठल्याच मंत्र्याने केली नसतील. मराठी भाषा विभाग, मुंबई शहर विभाग किंवा शिक्षण विभाग असेल, प्रत्येक विभागात मी केलेल्या कामांवर ग्रंथांचे खंडच्या खंड निघू शकतील. आपल्या मोदीसाहेबांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही घोषणा केली ती माझ्या ‘एक राज्य एक गणवेश’ या कल्पनेपासून स्फूर्ती घेऊन.
– पण त्या योजनेत गणवेशाच्या कापड खरेदीत मोठा भ्रष्टाचार होता, असं तुमच्याच पक्षातले काही नेते सांगतात. ते खरं आहे का?
– मुळीच नाही. तो माझ्या बदनामीचा कट होता. मला तर शिक्षकांचीही ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना अंमलात आणायची होती. शिक्षिकांना भगवी नऊवारी साडी आणि शिक्षकांना भगवे धोतर! माझ्या डोळ्यांसमोर आजही भगवे मास्तर आणि मास्तरणींचं चित्र तरळतंय. शाळांच्या इमारतींनाही भगवा कलर मारण्याचं कंत्राट देण्यासाठी मी रशियन पेंटसह इतर कलर कंपन्यांशीही त्यावेळी बोलणी करत होतो, पण या विघ्नसंतोषी नेत्यांनी मी या व्यवहारातही भ्रष्टाचार करणार अशी बोंबाबोंब करून माझं ते भगवं स्वप्न उधळून लावलं. नाहीतर आज महाराष्ट्र खर्या अर्थाने भगवा दिसला असता. केंद्राची चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना नापास झाले तरी पुढच्या वर्गात ढकलण्याची ढकलगाडी योजना महाराष्ट्राच्या शाळाशाळांत मी शंभर टक्के अंमलात आणली होती. आजचे विद्यार्थी हे महायुतीचे उद्याचे मतदार आहेत, हे लक्षात घेऊनच मी त्या आदर्श योजनेची भक्कम पायाभरणी करत होतो. नापास होऊनही पुढच्या वर्गात ढकलणारं हे सरकार कायम सत्तेवर येऊ दे, अशी प्रार्थना ते देवापाशी करत असतानाच कोणीतरी याचे श्रेय शालेय शिक्षणमंत्री केसरकरांना मिळतंय असे मोदीसाहेबांचे कान आमच्या पक्षातल्य्ााच काही नेत्यांनी फुंकले आणि मोदीसाहेबांनी या योजनेला चाप लावला. आज मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मिळालेलं स्थान हे मी केलेल्या दीर्घ प्रयत्नांमुळेच मिळालं हे सत्य या दुष्ट प्रवृत्तींनी जनतेपर्यंत पोहोचू दिलं नाही हे मराठी भाषेचं दुर्दैव! तरी मी निराश नाही. माझं मंत्रीपद देव ठरवत असतो. त्याने मनावर घेतलं तर मी मंत्रीपदापेक्षाही उच्च पदावर जाईन. पाहशीलच तू!
– टोक्या टोचणकर