हे नवीन वर्ष आपलं नाही, असं जोरात सांगणारे लोक त्यांचा पगार चैत्र, वैशाखाच्या तिथीनुसार घेतात का? तशा तर आपल्या रोजच्या वापरातल्या बर्याचशा सोयीसुविधांचा शोधही आपण लावलेला नाही. मग काय परत
बैलगाडी युगात जायचं?
– यश टेमगिरे, दौलताबाद
तुम्ही सोयी सुविधांच्या शोधाच्या गोष्टी करताय? अहो, दुसर्याच्या प्रार्थनास्थळाखाली आपलं प्रार्थनास्थळ ‘शोधण्याचं’ युग आलंय आणि तुम्ही काय लिब्रांडू लोकांसारखं विचारताय! आपल्याला अजून खूप मागे जायचंय… मानव खरंच माकड होता का? याचा शोध घ्यायचाय. डार्विनला खोटं ठरवायचंय. त्यामुळे काही दिवसांनी आपण अश्मयुगात आलो का, असं वाटलं तरी तसं वाटून घेऊ नका.. आणि पगाराचं म्हणालं तर चैत्र वैशाखाला जर पगार घेतला… तर तो दानधर्माला तरी पुरेल का? (उत्तर भोचक वाटलं, तर तुमचा प्रश्न खोचक आहे असं समजा.)
लग्नाआधी मी एकटा राहात होतो, सगळं नीट चाललं होतं. लग्नानंतर बायकोने मी खूप पसारा करतो म्हणून सगळं आवरून ठेवायला सुरुवात केली आणि एकही वस्तू मला जागेवर सापडेनाशी झाली… याला काय अर्थ आहे?
– अभिषेक घोरपडे, नाशिक
उपाय अगदी सोपा आहे. ज्या जागेवर बायको जी वस्तू ठेवते त्याच जागेवर ती वस्तू ठेवा, नाही तर बायको तुमचं काही जागेवर ठेवणार नाही… (वस्तू हो!) पदरी पडलंय ते मान्य करा.. उगाच बंडबिंड करण्याची नाटकं करू नका. नाहीतर आयुष्यभर ‘मिंधे’ बनून राहावं लागेल (बायकोचे). आलिया भोगासी असावे सादर, असं स्वत:ला समजवा आणि चादर बघून पाय पसरा, नाहीतर भर थंडीत फक्त गोधडी नशिबी येईल… (फक्त गोधडीत ‘हवी तशी’ ऊब मिळत नाही. वर चादर लागतेच… तुमचं नवीन लग्न झालंय म्हणून सांगतोय.. ‘गोड’ गैरसमज नसावा.)
ईव्हीएम झकास आहे, निवडणुकीत काही घोटाळा नाही, तर मग निवडणूक आयोग लोकांना माहिती द्यायला का नकार देतो? केंद्र सरकार रातोरात कायदा बदलून माहितीच मिळणार नाही, अशी व्यवस्था का करतं? कुछ तो गडबड है दया…
– विश्राम पाटील, कोल्हापूर
कुछ तो गडबड है असे दयाला म्हणालात, तरी त्याला म्हणावं फक्त दरवाजावर लाथ मार… ईव्हीएमवर पोट भरणार्यांच्या पोटावर पाय मारू नकोस… दया कर त्यांच्यावर… अहो ईव्हीएम बंद झालंच (असं फक्त समजा) तर बिचारे पोट कसं भरणार? रस्त्यावरचे अनधिकृत फेरीवाले म्युन्सिपालिटीची गाडी आल्यावर धंदा वाचवण्याची धडपड करतात, ते काय धंद्यात काही गडबड असते म्हणून नाही, तर फक्त धंदा अनधिकृत असतो म्हणून… यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडते का बघा… बाकी दुसर्यांच्या धंद्याबद्दल आम्ही नाही बोलत. (कारण दुसर्यांच्या धंद्याबद्दल बोललं की बोलणार्याचा कामधंदा बंद होतो, असं ऐकून आहोत.)
२०२४मध्ये केलेल्या कोणत्या चुका २०२५ या वर्षात टाळण्याचा निर्धार तुम्ही केला आहे?
– सुहास देशमुख, सिन्नर
२०२४मध्ये नकळत झालेल्या चुका २५मध्ये पुन्हा होतायत, हे आम्हाला ‘जर’ कळलं ‘तर’ आम्ही त्या टाळणार ना? कारण काही चुका ‘कळल्या’ तरी ‘टाळल्या’ जाणं आमच्या हातात नाहीत. उदाहरणार्थ निवडणुकीतल्या चुका… (मी जस्ट उदाहरण दिलंय… ज्यांनी या चुका सिरियसली घेतल्या पाहिजेत ते सुद्धा सिरियसली घेत नाहीयेत… सो तुम्ही सुद्धा डोन्ट टेक सिरियसली.)
डॉ. मनमोहन सिंग आणि निर्मला सीतारामन या देशाच्या दोन अर्थमंत्र्यांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो?
– विनीता पाचपोर, सोलापूर
कांदा लसूण आणि आळवाचं फतफतं यांच्यात जसा फरक आहे तसा… (तुम्हाला हे उत्तर पटलं असेल तर ही एक बाजू झाली.) काहीजण आळवाचं फतफतं खाऊन सुद्धा आदळआपट करतात, तर काहीजण कांदा लसूण खाऊनही धीर गंभीर आणि शांत असतात… (ही दुसरी बाजू झाली… आम्ही फक्त दोन्ही बाजू सांगितल्या… उगाच एक बाजू सांगितल्यावर दुसर्या बाजूवाला आम्ही कांदा लसूण खात असणार म्हणून आमच्या नावाने आदळ-आपट करायचा!)
नव्या वर्षात आपण नव्या थापा मारण्याचा उच्चांक गाठणार, असा संकल्प ज्याने सोडला आहे, असा एखादा माणूस माहिती आहे का तुम्हाला?
– निलेश सावंत, नगर
ऑनलाइन सर्च करा… (‘तो’ जर माणूस असेल तर नक्की नाव सापडेल… पण लक्षात ठेवा ‘तो’ माणूस नसेल, तर नक्कीच देवाचा अंश असेल… आणि ‘तो’ करतो ते सगळं ‘सोच समझ कर’ करतो, हे समजून घ्या. त्या तुम्हाला थापा वाटल्या तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे… ‘त्याचा’ नाही.)