मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती होऊन आज ६५ वर्षे झाली. तरी महाराष्ट्राचा दिल्लीश्वरांशी असेलला संघर्ष अजून संपलेला नाही. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा संघर्ष महाराष्ट्राने आठवायला हवा. १९५५च्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने जोर पकडला होता. सेनापती बापट, एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे अशा दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढ्याला धार आली होती. संप, बंद, मोर्चे या लोकशाही मार्गाने लढा सुरू होता. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाईंच्या पोलिसांनी, निदर्शकांवर गोळीबार केला. या बेछूट गोळीबारात १०६ माणसे ठार झाली. यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिकच पेटली. १९५६च्या सुरुवातीला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याचा इरादा स्पष्ट केला. नेहरू यांच्या या वक्तव्याने आंदोलक अधिकच भडकले. पोलिसांच्या गोळ्यांना आंदोलक बळी पडले, हुतात्मा झाले. या सर्व घटनांचे साक्षीदार अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख होते. ते केवळ बुद्धिवानच नव्हते, तर महाराष्ट्राभिमानी आणि संवेदनशीलही होते.
इतिहास सांगतो की, एका प्रसंगी बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याने पहिल्या बाजीरावास कविता लिहून निर्वाणीची हाक दिली होती. ती अशी… ‘जो गत भई गजेंद्र की सो गत भई आज । आजी जान बुंदेल की राखा आजी लाज।।’ त्याच धर्तीवर प्रबोधनकार ठाकरे यांनी या प्रसंगी सी.डी. यांना लिहिले, ‘जो गत भई गजेंद्र की सो गत भई आज । बाजी जान बंबई न महाराष्ट्र की राखो सी. डी. लाज।।’ सी. डी. देशमुख यांच्यातील या घटनेनंतर त्यांचा स्वाभिमानी मराठी बाणा जागवला गेला आणि केंद्रीय अर्थमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा विचार सी.डी. यांच्या डोक्यात घोळू लागला.
जुलै १९५६मध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी साधकबाधक चर्चा न करता पंतप्रधान पं. नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रविरोधी निर्णय घेतला. सी. डी. देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भारत सरकारने न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुर्नरचना आयोग’ स्थापन केला होता. महाराष्ट्रद्वेष्ट्या अमराठी लोकांचा, व्यापार्यांचा महाराष्ट्रात मुंबई ठेवण्यास तीव्र विरोध होता. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की, महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई शहर अशा तीन राज्यांची निर्मिती करावी. हा निर्णय सी. डी. यांना पटला नाही. आर्थिकदृष्ट्या ही योजना योग्य नाही असा इशाराही त्यावेळी त्यांनी दिला. सी. डी. यांना हे न पटल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष देवगिरीकर यांना फोनवरून नाराजी कळवली. देवगिरीकर यांना देखील हा निर्णय आवडला नाही. देवगिरीकर, भाऊसाहेब पाटसकर आणि आळतेकर हे सी.डी. यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. त्यावेळी या निर्णयाविरोधात सर्वांनी राजीनामा द्यायचे ठरले. पण नंतर देवगिरीकर काँग्रेसचे असल्यामुळे काँग्रेस हायकमांडला ते दुखवू शकले नाहीत आणि त्यांनी आम्हाला राजीनामे देता येणार नाहीत हे नम्रपणे सी.डीं.ना सांगून माफी मागितली, आम्ही जन्मभर काँग्रेसमध्ये आहोत. आम्हाला हायकमांडचा आदेश डावलता येणार नाही. त्यावर सी.डीं.नी तत्काळ उत्तर दिले, ‘‘मी काँग्रेसचा एक पैशाचा लाचार नाही. तेव्हा माझा राजीनाम्याचा निर्णय कायम आहे.’’
मुंबई केंद्रशासित करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले तेव्हा पुन्हा एकदा राजीनामा स्वीकारण्याची विनंती पंतप्रधान नेहरू यांना केली. त्यावेळी सी.डी. यांना ‘थोडं थांबा’ असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. पंतप्रधानांनी काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत सी.डी. यांना आपली भूमिका मांडण्याची परवानगी दिली. सी.डी. यांनी भूमिका मांडली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण हायकमांडचा निर्णय आधीच झाला होता. या बैठकीतील राग-रंग पाहून सी.डी. बैठकीतून उठले आणि म्हणाले, ‘मी विरोध नोंदवून लोकसभेतील सदस्यत्वाचा राजीनामा देईन. त्यावेळी पंतप्रधान नेहरूंसह ज्येष्ठ मंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी त्यांना बैठक सोडून जाऊ नका असा सल्ला दिला, पण तो सी.डी. यांनी मानला नाही. आपण राजीनामा का देत आहोत याची सर्व पार्श्वभूमी त्यांनी लोकसभेत सांगितली आणि अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सभागृह सोडले.
लोकसभेतील सी. डी. देशमुख यांच्या भाषणांनी मराठी अस्मितेचा अंगार फुलवला. मराठी स्वाभिमानी बाण्याचे दर्शन देशाला घडवले. या राजीनाम्याच्या भाषणानंतर संसदेतील वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्यावेळी उत्फूर्तपणे दाद दिली. मद्रास प्रांताचे खासदार डॉ. लंकासुंदरम म्हणाले की, ‘‘सी. डी. देशमुख यांचे भाषण ऐकताना माझ्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले होते. दुसर्या खासदाराने ‘रुबाबदार आणि विदारक भाषण’ अशी स्तुती केली. महाराष्ट्रातील शंकरराव मोरे म्हणाले, ‘‘देशमुख बोलत असताना शिवकालीन इतिहासातील मोठे वीरपुरुष माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, खंडो बल्लाळ, सखाराम हरी यांचे खरे वंशज शोभतात देशमुख.’’ पंजाबमधील एका ज्येष्ठ सदस्याने पंजाबच्या अत्याचारानंतर मध्यवर्ती कायदेमंडळात मदन मोहन मालवीय यांनी गोळीबारात मेलेल्या एका पंजाबी युवकाचे चित्र हाती घेऊन भाषण केले होते. त्याच प्रतीचे भाषण देखमुख यांनी केले. तर बिहारच्या सदस्यांनी सांगितले की, ‘‘कित्येक वर्षात विरोधी पक्षाला जमले नाही ते सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांनी या तीस मिनिटांच्या भाषणातून केले.’’ मद्रासचे सदस्य डॉ. मुदलियार म्हणाले, ‘‘तुमच्या धंदेवाईक देशभक्तांना ते करता आले नाही. ते नोकरी केलेल्या एका व्यक्तीने करून दाखविले.’’ सी.डी. यांच्या भाषणाचे असे चौफेर कौतुक झाले.
राजीनाम्याच्या दुसर्या दिवशी आचार्य दोंदे आणि आचार्य अत्रे हे सी. डी. देशमुख यांना भेटावयास गेले. तेव्हा चिंतामणराव म्हणाले, ‘‘इतके दिवस संयुक्त महाराष्ट्रासंबंधी मी काहीही कुठे बोलत नव्हतो. म्हणून महाराष्ट्रातले कित्येक लोक माझ्यावर चिडले होते. पण दारूगोळा जमवून ठेवायचा असतो. वाटेल तसा रस्त्यावर उधळायचा नसतो. ही माझी भूमिका होती. शत्रूसैनिकांच्या डोळ्यांचा पांढरा भाग दिसू लागला म्हणजे मग बंदुका उडवा असे ड्यूक ऑफ वेलिंग्टन आपल्या सैनिकांना सांगत असे. योग्य प्रसंगी मी माझी तोफ डागली, म्हणून त्याचा एवढा परिणाम झाला. आता माझे कार्य संपले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आता तुम्ही नेटाने चालवा. मी तुम्हास सल्ला देईन. नेतृत्व पत्करणार नाही. राजकारण हा माझा धर्म नाही. प्रत्येकाने स्वधर्मास जागावे. मुंबई शहर महाराष्ट्रापासून तोडण्यात देशाचे मुळीच कल्याण नाही. देशाचे कल्याण असते, तर ते शहर कायमचेच वेगळे ठेवावयाला हवे होते. पाच वर्षांनी महाराष्ट्रात त्याचा समावेश करावयाचे ठरविले तर मग देशकल्याणाचा मुद्दा खोटा ठरतो. मुंबई केंद्राशासित झाल्याने सर्वांत जास्त नुकसान महाराष्ट्रातील गरिबांचे होणार आहे. ते पट्टेवाले, मजूर, कारकून, ती मध्यमवर्गीयांची कुटुंबे या सर्वांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि हे सगळे कशासाठी? त्यामुळे भारताचे कल्याण होते आहे हेही समाधान आपल्याला लाभत नाही. मग कशासाठी एवढ्या लोकांचा हा नाश करावयाचा?’’ सी. डी. देशमुख यांचा युक्तिवाद बरोबरच होता.
डॉ. सी. डी. देशमुख यांनी तीस मिनिटांच्या भाषणात निर्भेळ सत्यच सांगितले. आपल्या भाषणांनी मोरारजी देसाईंना गारदच केले. पंतप्रधान नेहरू यांना तोंडावर सांगितले की, ‘‘तुम्ही मंत्रिमंडळाची सर्व सत्ता बळकावणारे आणि नागरिक स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हुकुमशहा आहात.’’ त्याकाळी नेहरू यांच्यासमोर बोलण्याची कुणा मंत्र्यांची अथवा काँग्रेस सदस्यांची हिंमत नव्हती. ती हिंमत मर्द मराठा सी. डी. देशमुख यांनी दाखविली. सी. डी. यांचे ऐतिहासिक भाषण ऐकताना पंडित नेहरू यांची स्थिती अतिशय अनुकंपनीय झाली होती. त्या जळजळीत भाषणासमोर नेहरू यांचे उत्तरादाखल भाषण मिळमिळीत आणि बुळबुळीत झाले. सी.डी. यांच्या जाज्ज्वल्य महाराष्ट्र बाण्यामुळे संयुक्त महाराष्ट्र लढ्याला बळ मिळाले.
दिल्लीत कुठल्याही पक्षाचं सरकार असो, दिल्लीश्वरांच्या मनात महाराष्ट्राविषयी आकसच राहिला आहे. महाराष्ट्रात कुठे फट्ट झाले तरी ब्रह्महत्त्या झाल्याची आवई उठवली जाते. राईचा पर्वत करून महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे कारस्थान रचले जाते. आजही केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. त्यामुळे लाखो मराठी तरुण बेरोजगार झाले आहेत. देशाचे मुख्य आर्थिक केंद्र असलेले मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी अनेक सरकारी आस्थापने, कॉर्पोरेट कार्यालये, हिरे व्यापार, कपडा बाजार यांचे गुजरातला स्थलांतर केले गेले आहे.
सत्ताधारी पक्षाकडून आणि महाराष्ट्रद्वेष्ट्यांकडून महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा सतत अपमान केला जात आहे. मराठी भाषेचे खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या माध्यमातून तिसर्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात केली जात आहे. मुंबईतील मराठी भाषिकांचा टक्का कमी झाला आणि मुंबई मराठी भाषिकांची नसून ‘कॉस्मॉपॉलिटीन सिटी’ आहे, असे सत्ताधार्यांकडून आणि मराठीद्वेष्ट्यांकडून वारंवार भासवून, मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या मुंबई-महाराष्ट्राविरोधातील षडयंत्राच्या विरोधात मराठी माणसाने एकत्रित येऊन महाराष्ट्र वाचवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखी चळवळ पुन्हा उभारण्याची गरज आहे. महाराष्ट्रदिनी हा वज्रसंकल्प करू या.