मराठी रंगभूमीवर बंदिस्त चौकटीतली नाटके येत असतात. त्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचे ‘प्रयोग’ नव्या पिढीचे रंगधर्मी करतात. वेगळ्या वाटेवरुन नवं शोधण्याचा प्रयत्नही त्यामागे असतो. तो नेहमी यशस्वी होतो असं नव्हे, पण नाटकाच्या निमित्ताने मिळालेली संधी निसटू नये, संधीचं सोनं करावं यासाठी सारा खटाटोप दिसतो खरा. त्यात दोन अंकी पूर्ण नाटकांच्या दालनातही जुने नाटक, जुनाच विषय नव्या रंगरूपात सादर करण्याचा रंगखेळ सध्या रंगताना दिसतोय. रत्नाकर मतकरी यांचे १९७२ साली आलेल्या आणि आज ५३ वर्षानंतर नव्या दमात सुरू असलेल्या ‘अलबत्या-गलबत्या’ नाटकाने डाव मांडलाय, तर दुसरीकडे नाट्यगुरू नरेंद्र बल्लाळ यांची ५५ वर्षापूर्वीची ‘अंजू’ ही ‘अंजू उडाली भुर्रऽऽऽ’ या नाटकातून प्रगटली आहे. जुनं नाटक नव्या चष्म्यातून बघणं हा खरोखरच एक विलक्षण अनुभव म्हणावा लागेल, बालनाटकांच्या दुनियेतले हे आविष्कार नोंद घेण्याजोगे आहेत.
बालनाटकांसाठी स्वतंत्र रंगभूमी ही संकल्पना तशी मूळची परकीय. सुधाताई करमरकर आणि रत्नाकर मतकरी यांनी सर्वप्रथम ‘मधुमंजिरी’या बालनाट्याचा व्यावसायिकवर प्रयोग केला आणि बालनाट्याचे दालन अलगद उघडले गेले. आज या प्रवाहात विविधता आली तसेच ते समृद्ध बनले. बालनाट्य स्पर्धा, बालनाट्य शिबीरे, एकपात्री प्रयोग, पथनाटिका, विज्ञानविषयक एकांकिका स्पर्धा हे सुट्टीपुरते उपक्रम उरलेले नाहीत तर ते पूर्ण शैक्षणिक वर्षात सुरूच असतात. त्यामागे नाट्य या कलाप्रकाराचे महत्वच अधोरेखित होतंय. आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास, कठीण विषयाची उकल, तणावमुक्ती यासाठीही याकडे आजकाल गंभीरपणे बघितले जाते. अभिव्यक्तीचे अनेक कंगोरे यातून आजवर उघडले गेले आहेत. एका पिढीने साठेक वर्षापूर्वी केलेल्या पायाभूत मांडणीचा सकारात्मक परिणाम शालेय व महाविद्यालयीन वातावरणात दिसून येतोय. एवढंच नव्हे तर अपंग, अंध, मनोरुग्ण, बेघर, कष्टकरी मुलांसाठीही नाटकातूनच आत्मविश्वास देण्याचे मोलाचे काम मराठी बालनाटकांनी केलंय. ही अभिमानाची घटना आहे. असो ‘अंजू उडाली भुर्रऽऽऽ’ या नव्या बालनाट्याकडे वळूया…
ज्युडी गार्लंड या बालकलावतीच्या अभिनयाने गाजलेल्या १९३९ सालातल्या द विझार्ड ऑफ ऑझ या हॉलिवुडच्या अजरामर चित्रपटावर हे नाटक बेतलेलं आहे. एल. फ्रँक बॉम यांनी लिहिलेल्या द वंडरफुल विझार्ड ऑफ ऑझ या कादंबरीचा त्याला आधार आहे. महाराष्ट्रातलं एक गाव. तिथे छोटसं घर. घरात शाळकरी मुलगी अंजू आणि तिचा लाडका कुत्रा टोटो (हे नाव मूळ सिनेमातल्या कुत्र्याचं). दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. एके दिवशी अचानक वादळी वारा सुटतो. उंच हवेत अज्ञात स्थळी अंजूचं झोपडीवजा घर पोहचतं. नवलनगरी दिसते. जंगल, पानफुलं, नवं जग दिसतं. तिथे दोन चेटकिणी आणि एका जादूगाराचं वास्तव्य आहे. एक चेटकीण सुंदर, प्रेमळ तर दुसरी विद्रूप क्रूर. अंजूला आईची आठवण येते. पण ती अजब दुनियेत पोहचलेली. या नगरीत मांजराचा आवाज काढणारा भित्रा सिंह, गवताच्या गेटअपमध्ये मेंदूच गायब झालेला गवत्या, पत्र्याचा बनलेला पण हृदयच गायब असलेला पत्र्या, हे साथीदार भेटतात. त्यांच्याशी मैत्री होते. अंजूला महाराष्ट्रातल्या तिच्या घरी जायचं आहे. तिची आई वाट बघत असेल म्हणून ती काळजीत आहे. भित्र्या सिंहाला आक्रमकता हवीय, गवत्याला मेंदू आणि पत्र्याला हृदय हवंय. कुणाला काहीतरी हवंय. पण हे हरविलेले परत कसं काय आणि कोण मिळवून देणार हा सार्यांपुढे प्रश्न उभा आहे. अखेरीस या नवलनगरीतल्या जादूगाराकडे जाण्याचे ठरते. तो जादूने सर्वांना हवं ते मिळवून देईल, अशी सार्यांना खात्री आहे. हा जादूगार विविध रुपं धारण करणारा आहे. तो कधी द्वारपाल बनतो तर कधी रजनीकांत, चिनी वेटर, कंतारा… अशी जादुई रुपं त्याच्याकडे आहेत. त्याच्या जादूनगरीत सारेजण पोहचतात. दृष्ट, क्रूर चेटकिणीचा बदला घेण्यासाठी तिला आधी ठार करा मगच तुमच्या मागण्या मान्य करीन, असे वचन तो देतो. आणि अखेर सारेजण चेटकिणीच्या भयानक गुहेत पोहचतात. बुरुजांवरून चेटकीण या पाहुण्यांवर लक्ष ठेवून असते. या शक्तिशाली चेटकिणीचा खातमा करण्याचे आव्हान या सार्यांपुढे आहे. चेटकीण अंजूला गुलाम करते. तर सिंहाला पिंजर्यात बंदिस्त. गवत्या आणि पत्र्याला ठार करते. आता यातून अंजूची सुटका कशी काय होणार? अंजू घरी कशी पोहचणार? आईची भेट होणार की नाही? चेटकिणीचा विश्वास अंजू मिळविते का? चेटकिणीचा जीव कशात आहे? जादूगाराची जादू खरी का खोटी? हे सारं स्वप्न की सत्य? प्रश्न आणि प्रश्न. बालरसिकांना याची उत्तरे ही अखेरीस मिळतात. पण अंजूच्या टीमला एका खडतर, प्रवासातून जावं लागतं…
उंची कमी पण विनोदाची जाण उंच! याचा प्रत्यय पुन्हा एकदा विनोदवीर अंकुर वाढवे याच्या सप्तरंगी भूमिकेतून आला. नाटकभर त्याचा जादूगार अक्षरश: धूमाकूळ घालतो. जोकर, द्वारपाल, रजनीकांत, कांतारा, सुंदरी, अशा विविध रंगरुपातली त्याची देहबोली भरपेट हसवून जाते. काही मिनिटातच नव्या रुपात प्रगटणं, हे विलक्षण चपळाईने भरलेलं. मुद्राभिनय, विविध हालचाली, पूरक आवाजाचा ढंग यामुळे अंकुर कथेला उत्कर्षबिंदूपर्यंत पोहचविताे.
‘यदाकदाचित’ नाटकातील गाजलेली गांधारी म्हणजे पौर्णिमा अहिरे. तिने यात दुष्ट चेटकिणीची भूमिका केलीय. काहीदा घाबरविणारी तर काहीदा हसविणारी. ‘क्रूर हास्य’ ही जमेची बाजू ठरते. बालनाट्यातली चेटकीण हा कायम कुतूहलाचा विषय. त्यात या नव्या चेटकिणीची भर पडली आहे. व्यावसायिक नाटक, मालिका यात बिझी असणारे अंकुश आणि पौर्णिमा या दोघांनी या बालनाट्यासाठी वेळ राखून ठेवला, हे महत्वाचे.
ज्या ‘अंजू’भोवती हे नाट्य गुंफलं आहे, त्या ‘टायटल रोल’मध्ये स्कंदा गांधी हिने ही भूमिका संयमाने साकार केलीय. अभिनयात सहजता असून समर्थपणे अंजू उभी केलीय. तिचं आगमन कौतुकास्पद आणि भविष्यात आशा वाढविणारं आहे. यापूर्वी अनेक बालनाट्यात दिसणारा चिंतन लांबे याने गवताचा भार उचलून गवत्याची भूमिका चांगली केलीय. विजय मिरगे याने केलेल्या पत्र्याची हालचाल अप्रतिमच. बाबली मयेकर याची घाबरट सिंहाची देहबोली शोभून दिसली. गुलाब लाड (परी, चेटकीण), गौरवी भोसले (आई), प्राची रिंगे (ससा, लांडगा) प्राधीर काजरोळकर (टोटो) यांनीही नाटकात हजेरी लावली आहे. एकूणच, कलाकारांचं टीमवर्क उत्तम.
या बालनाट्याचे पुर्नलेखन, दिग्दर्शन आणि गीते ही कल्पक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांची आहेत. एकूणच सादरीकरणाला देण्यात आलेली ट्रीटमेंटही ‘फ्रेश’ आहे. नाट्य कुठेही रेंगाळू दिलेले नाही. अभिनय, ताल-सूर-नृत्य आणि गाणी याची जुळणी उत्तम. बालकांसह पालकांचे मनोरंजन करण्याचा त्यामागे प्रयत्न दिसतोय. ‘ब्लॅक आऊट’मधली गाणी आणि त्यातून प्रसंग बदल यामुळे नाट्य वेगवान बनलंय. बालकांच्या नाट्यातील ‘फॅन्टसी’ असल्याने तांत्रिक बाजूंची जमवाजमव बरीच केलीय. त्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. बालरसिकांशी थेट संवाद, त्यांचाही प्रतिसाद काहीदा घेण्यात आलाय. टाळ्या, हशा यासाठी काही हक्काच्या जागा तयार करण्यात आल्यात, त्यामुळे नाट्याची रंगत अधिक वाढते. वेगळी रंगमंचीय भाषा शोधण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न नजरेत भरतो.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी नेपथ्यरचनेत विविधता आणली असून घर, जंगल, जादूगार आणि चेटकीण यांची स्थळे, गुहा, निरीक्षण बुरुज हे सारं काही नेमकेपणानं उभं केलंय. पार्श्वभूमीवरली बदलती चित्रे देखील वातावरणनिर्मितीस पूरक आहेत. नेपथ्यमांडणीतून रंगतीत वेगळीच भर टाकली आहे. प्रत्येक पात्ररचना ही वैशिष्ट्यपूर्ण असल्याने श्रद्धा माळवदे व पूजा देशमुख यांनी वेशभूषा आणि उदयराव तांगडी यांची रंगभूषा विचारपूर्वक केलीय. सार्यांचेच गेटअप आव्हानात्मक आहेत. ते बालकांना त्यांच्या स्वप्ननगरीत निश्चितच घेऊन जाईल. जादुगाराच्या वेशभूषेतली विविधता चेटकिणीचे नाक आणि बोट, गवत्याचे तसेच पत्र्याचे दिसणं, हे नोंद घेण्याजोग. अनेक मालिका, नाटके यांना ‘टायटल साँग’ देणारे संगीतकार तुषार देवल यांचे संगीत ताल धरायला भाग पाडते. शीर्षकगीत अवधूत गुप्ते यांनी म्हटलेय जे मस्तच. सिद्धेश दळवी यांनी नृत्यदिग्दर्शन केलंय तेही बालरसिकांनी वाचून डोक्यावर घेतलं. श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजना चांगली आहे. तांत्रिक बाजूंनी परिपूर्ण असा हा आविष्कार आहे. भट्टी चांगली जमली आहे. फॅन्टसी उत्तमरीत्या प्रगट होते.
मराठी रंगभूमीवर तळमळीने, निष्ठेने बालनाट्याची पताका सातत्याने फडकविणारे अशोक आणि चित्रा पावसकर या दांपत्याने नाटकाची निर्मिती केलीय. त्यांना सोबत डॉ. सलील सावंत यांची आहे. रंगभूमीवर गेली पन्नासेक वर्षे अनुभवसंपन्न असलेल्या या दांपत्याने भूतकाळाला उजळा दिलाय. एका सुपरहिट बालनाट्याच्या पुर्नजन्माचे ते साक्षीदार आहेत. ५७ वर्षापूर्वी या नाटकाची निर्मिती ‘नवल रंगभूमी’ने केली होती. त्यात चित्राताई चेटकीण तर अशोक पावसकर हे गवत्याच्या भूमिकेत होते. अंजूच्या प्रमुख भूमिकेत इला भाटे होत्या. सोबत दिगंबर राणे हेदेखील होते. त्यावेळी या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. एका बालनाटकाचे साक्षीदार आज निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. एका आवडत्या कलाकृतीचे कलाकार ते निर्माते असा त्यांचा वावर झालाय. याही भूमिकेतून त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. निर्मितीमूल्यांत कुठेही कसूर नाही. तडजोडही नाही. निर्माता शंभर टक्के थिएटरचा माणूस आहे, निव्वळ पैसा पुरविणारा नाही, हेदेखील मान्य करोवच लागेल.
मराठी बालनाटकांवर अनेक प्रकारची आक्रमणे, अतिक्रमणेही होत आहेत. त्यात बालरसिकांचा वाढलेला अभ्यास, क्लासेसच्या वेळा, जीवघेणी स्पर्धा यामुळे बालमनाचा कोंडवाडा ठरतोय. दुसरीकडे मोबाईलचे वाढते वेड, इलेक्ट्रॉनिक माध्यमांची गर्दी, गेम, मालिका, दूरदर्शन यांनीही हातपाय पसरले आहेत. तिसरीकडे निर्मात्यांचा वाढता खर्च, तालमीच्या जागेचा प्रश्न, सवलत, अनुदानाची बोंब, एकाच तराजूत बालनाटके आणि मोठ्यांची नाटके यांना समान न्याय ही संकटे निर्मात्यापुढे उभीच आहेत. परिणामी काही निवडक निर्माते स्पर्धेत दर्जेदार बालनाट्य निर्मितीचा विचार करतात, ही वस्तु:स्थिती आहे. परिणामी परिपूर्ण बालनाट्ये नाट्यगृहापर्यंत पोहोचू शकत नाहीत. बालमनाचे रंजन-अंजन करणारे ‘नाट्य’ हे प्रभावी माध्यम म्हणावे तेवढे विकसित झालेले नाही. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न अशा निर्मितीतून थोड्याबहुत प्रमाणात का होईना, होतोय. हेही नसे थोडके! बदलत्या काळात काही संहिता आजही संगणकयुगात पाय रोवून उभ्या आहेत. त्यातली ही नव्या रंगरुपातली अंजू!
हा प्रयोग पूर्णपणे शब्दातून पकडणे तसे अशक्यच आहे, कारण सादरीकरणाचे प्रत्येक दालन गच्च भरलेले आहे; त्यामुळे नाट्यप्रयोग थेट अनुभवणं उत्तम! दीर्घ कालावधीनंतर जादूगार, परी, चेटकीण, विदुषक, माकड, सिंह, कुत्रा, ससा ही बालमनावर राज्य करणारी पात्रे या निमित्ताने रंगभूमीवर अवतरली आहेत. बालकांना मोबाईलपासून दोन घटका सुटकेसाठी आणि दर्जेदार चैतन्यमय बालनाट्य बघितल्याच्या समाधानाकरिता बालक-पालक या दोघांना यातून संधी निश्चितच मिळेल यात शंकाच नाही.
अंजू उडाली भुर्रऽऽऽ
लेखक : नरेंद्र बल्लाळ
दिग्दर्शन / गीत : राजेश देशपांडे
नेपथ्य : संदेश बेंद्रे
संगीत : तुषार देवल
प्रकाश : श्याम चव्हाण
नृत्ये : सिद्धेश दळवी
सूत्रधार : नितीन नाईक
निर्माते : डॉ. सलील सावंत/ अशोक पावसकर
निर्मिती : प्रेरणा थिएटर्स