मध्यमवर्गीय मराठमोळे संस्कार दाखवलेल्या एका लोकप्रिय मालिकेत मध्यंतरी दसरा साजरा करताना दाखवले. रांगोळी, तोरणं, पारंपरिक कपडे अशा सगळ्या वातावरणनिर्मितीबरोबरच नायिकेने संध्याकाळी सोनं लुटायला आलेल्या मुलांच्या हातावर ठेवायला गोळ्या व साखरफुटाणे आणलेले दाखवले! लेखकाच्या निरीक्षणशक्तीला खरोखर दाद द्यावीशी वाटली. मला खात्री आहे, माझ्यासारखे अनेकजण साखरफुटाण्यांच्या केवळ उल्लेखानेच स्मरणरंजनात रमले असतील.
आजकाल सर्वांनाच साखरेचे वावडे झाले असले तरी मला आठवतंय लहानपणी आम्ही फार आवडीनं खायचो हे साखरफुटाणे! मुद्दाम विकत घेण्याचे प्रसंग मोजकेच, गणपतीच्या वेळी पूर्वी अनेक लहानमोठी ओळखी-अनोळखीची मुलं दर्शनाला यायची. त्यांच्या हातावर ठेवायला बाबा हमखास मोठ्ठे साखरफुटाणे आणत. त्या बाळमुठीत एकेक जरी पडला नं साखरफुटाणा तरी डोळ्यात चमक यायची त्यांच्या. तीच तर्हा दसर्याच्या वेळी. अलिबागला अजूनही मला या दोन्ही प्रसंगी साखरफुटाणे आठवतातच! अशीच आणखीन एक गमतीदार आठवण कुमीआजीकडची. आजोबा रोज वाराप्रमाणे वेगवेगळ्या देवळात दर्शनाला जायचे व येताना छोटीशी का होईना, साखरफुटाण्यांची पुडी घेऊन यायचे. रोजचेच झाल्यावर खाणार तरी कोण व किती? गोडघाश्या माझी मात्र चंगळ असायची. संपवले ते साखरफुटाणे तर हरकत नसायची कुमीआजीची, नाहीतर दुपारच्या चहात साखरेऐवजी त्यांची वर्णी लागे!
हा पदार्थ घरी बनविण्याच्या भानगडीत कोणीच पडत नसेल. मी उत्सुकता म्हणून यूट्युबवर पाककृती पाहिली, साखरेचा घट्ट पाक करून, त्याची मळी वगैरे काढून मोठ्या गोल व जोरात फिरणार्या यंत्रात तो पाक हळुहळू ओततात. त्या वेगामुळे व पाकाच्या घट्टपणामुळे लहान लहान गोळे बनायला सुरुवात होते. त्याच गोळ्यांवर आणखी पाकाची पुटं त्या यंत्रांतच चढवली की साखरफुटाण्यांवर काटा यायला सुरूवात होते व आकारही मोठा होत जातो त्यांचा. पांढरेशुभ्र साखरफुटाणे बघून चांदण्यांच परातीत भरल्यासारखे दिसत होते!
काळ्या चंद्रकळेवर घातले जाणारे दागिने पण अशाच शुभ्र हलव्याचे बनवतात. पहिल्या संक्रांतीला लेक-जावयाचे कोडकौतुक होते ते हलव्याच्या दागिन्यांनीच. पूर्वी हलवा घरी बनवला जायचा. अगदी खसखशी, तिळापासून मुरमुरे किंवा शेंगदाण्यांपर्यंत विविध पदार्थांवर साखरेच्या पक्क्या पाकाची पुटं चढवून बनवलेला काटेरी हलवा ही पण आपल्या संस्कृतीची शान आहे, असं म्हटल्यास वावगे नाही.
हा काटेरी हलवा जसा गोड बोलण्याची गळ घालतो नं तसेच लहानमोठे साखरफुटाणे नकळत आपल्याला त्या परमेशाशी जुळवतात. कोणत्याही लहानमोठ्या देवस्थानाला प्रसाद म्हणून नारळ, फळं किंवा मिठाई कितीही मिळत असले तरी साखरफुटाण्यांची जागा त्यांच्या टिकाऊपणामुळे अबाध्य आहे! बाकी गोष्टी सहज खाऊ म्हणूनही आपल्या किंवा खाल्ल्या जातात, मात्र समोरच्यांनी दिलेले साखरफुटाणे नकळत आपल्याला नतमस्तक करतात, त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या चरणी! साखरफुटाणे भरलेली मूठ आधी कपाळाला लावून मगच खाण्यासाठी तोंडाकडे जाते, नाही का? स्वत:च्या लहानशा रूपाचा व सर्वसामान्यपणे प्रसाद म्हणून होणार्या उपयोगाच्या आधारे हे साखरफुटाणे, चिरंजी किंवा राम अथवा नकुल दाणे नकळत समोरच्याचे अनुसंधान परमेश्वराशी साधतात. त्याचेच दूत बनतात जणू हे!!
आपल्याही वागण्याबोलण्यातून, विचारांतून तसेच कृतींमधून जर आपण त्या प्रेमळ परमेशाचा भाव असाच पुढे पोहोचवू शकलो तर आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा! एकेका व्यक्तिमत्वाची एकेक मुळातलीच व जोपासलेली अशी खासियत असते नाही का? कोणी नुसत्या उपस्थितीने वातावरणात शिस्त आणते तर कोणी सहजता. कोणी सकारात्मकतेची पखरण करतात तर काहींच्या आठवणीनेही निराशा झाकोळते मनाला!! जे आपल्या अंतरंगी दडलेलं असतं नंतरच नकळत या नानारूपात व्यक्त होत असतं. आपला मूळ भावच आपला स्वभावामागचे कारण असतो. तो एकदा का त्या परमेशाच्या कोणत्याही रूपाशी जुळला नं की नकळत आपणही त्याचे दूत बनतो. हनुमंताची शक्ती असो वा गणेशाचे बुद्धिचातुर्य, सांबाचा भोळेपणा असो वा देवीचे मातृत्व; एकदा का आपापल्या इष्टाशी आपले अनुसंधान साधले की नकळत त्या दैवताचे मुख्य स्वभाववैशिष्ट्य आपल्या माध्यमातून पुढे सहज पोहोचते. मनांची मरगळ झटकली जाऊन सकारात्मकतेनी मन उत्फुल्ल होते. भक्ताच्याच हृदयात भगवंताचा वास असतो हे त्या भक्ताच्या वागणुकीतून सिद्ध होते व तोच सात्त्विक भाव नकळत सहवासात आलेल्या सर्वांपर्यंत नकळत पोहोचतो, त्यांनाही त्या मूळ शक्तीशी सहज जुळवतो. हातावर पडणार्या दोनचार प्रसादी साखरफुटाण्यांसारखाच, नाही का?