सीमारेषांवरील जवानांच्या करमणुकीसाठी ‘सलामी’ हा कार्यक्रम संतोष परब आणि प्रशांत काशिद दरवर्षी आयोजित करतात. यंदाही ‘सलामी’ हा उपक्रम १ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ४५ कलावंत व तंत्रज्ञ यांच्यासोबत गुजरात राज्यातील बाडमेर, गडरा, नाडाबेट, दांतीवाडा, मेहेसाना, गांधीधाम, भुज व गांधीनगर या सीमावर्ती भागातील बीएसएफ जवानांच्या करमणुकीसाठी होणार आहे.
२०१५पासून बीएसएफसाठी करमणुकीचे कार्यक्रम करीत असताना आयोजकांच्या लक्षात एक गोष्ट आली होती की इथले जवान व अधिकारीसुद्धा तालासुरांशी मैत्री ठेवून आहेत. ही मंडळी खूप चांगलं गातात. आणि मग प्रशांत काशिदांच्या मूळ संकल्पनेतून ‘व्हॉईस ऑफ बीएसएफ’ ही राष्ट्रीय स्तरावरील जवानांची व अधिकार्यांची गायन स्पर्धा जन्मास आली. बीएसएफच्या मुख्यालयातून या संकल्पनेला परवानगीचा हिरवा कंदील दाखवण्यात आला. बीएसएफच्या इतिहासात प्रथमच होत असलेली ही स्पर्धा जवान आणि अधिकार्यांमध्ये उत्सुकता निर्माण करून गेली आहे. १ जानेवारी ते ५ मार्च २०२४ या प्रदीर्घ कालावधीत ही थरारक स्पर्धा पहिल्या भागात ऑनलाईन पद्धतीने आणि उपांत्य फेरी, अंतिम फेरी पारितोषिक वितरण सोहळा आणि ‘सलामी-२०२४’चा समारोप सोहळा २८ व २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवान आणि अधिकार्यांना आकर्षक पारितोषिके देण्याचाही आयोजकांचा मानस आहे. या सोहळ्यास मुंबईतील मान्यवर उद्योजक, कलावंत, आणि ‘सलामी’ संकल्पनेचे हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण उपक्रमास प्रसिद्ध गायिका माधुरी नारकर यांच्या स्वर्णस्वर फाऊंडेशन (नियोजित) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रिं. अजय कौल यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न होत असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण सोहळ्याची संकल्पना प्रशांत काशीद व संतोष परब यांची असून लेखन, दिग्दर्शन व आयोजनही त्यांचेच आहे.
संतोष परब म्हणाले, या प्रवासात आमची व्यवस्था अधिकारी मेसमध्ये असतानाही आम्ही सर्व पुरुष कलावंतांसहित मुद्दाम सैनिकांच्या बॅराकमध्ये झोपणे पसंत करतो. अर्थात महिला कलावंतांची व्यवस्था तिथल्या शिस्तीप्रमाणे महिला सैनिकांच्या बॅराकमध्ये असते. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत केलेली अर्धवट अंघोळ, सैनिकांनी बनवलेल्या नाश्त्याचा आस्वाद, पुन्हा पुढच्या ठिकाणचा शेकडो कि.मी.चा प्रवास आणि दुपारी पुन्हा सैनिकांसोबत जेवण आणि स्वत:चे जेवणाचे ताट स्वत: घासणे, कॅम्पमधला अधिकार्यांसोबतचा फेरफटका, सैनिकी सेवेबद्दलचे आकर्षण, संध्याकाळी कडक गणवेशातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत सैनिकांनी बनवलेली कांदाभजी व चहाचा आस्वाद घेऊन ‘सलामी’ या सैनिक करमणूक संकल्पनेतील धमाल प्रयोग आणि सैनिकांनी केलेली उत्स्फूर्त नृत्ये, त्यांनी गायलेली सुरातली गाणी, त्यांच्या प्रतिक्रिया, इतरभाषिक सैनिकांसोबत मराठी सैनिक जेव्हा आपुलकीने भेटायला येतात, तेव्हा या सर्व गोष्टींनी मन भरून येते, असेही ते म्हणाले.