मराठी रंगभूमीवर थरारक रहस्यकथा तशा अभावानेच आल्यात. बुकिंगची जुळवाजुळव करण्यासाठी कौटुंबिक किंवा मनोरंजनात्मक नाटकांना प्राधान्य देण्यात येतं. तरीही काही नाटके या वाटेवरून आली आणि रसिकांनी त्याचे स्वागतही केले. त्यात वसंत कामत यांचे ‘फोन नं. ३३३३३’, सरिता पदकी यांचे ‘खून करावा पाहून’, गो. ग. पारखींचे ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, कमलाकर नाडकर्णींचे ‘पस्तीस तेरा नव्वद’, सुदीप मोडक यांचे ‘एक शून्य तीन’, हेमंत एदलाबादकर यांचे ‘ती रात्र…’ अशी काही नाटके लक्षवेधी ठरलीत. त्याच वळणावरची नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित दोन नाटके एकापाठोपाठ रंगभूमीवर आलीत. पहिले ‘अ परफेक्ट मर्डर’ आणि आता ‘यू मस्ट डाय!’
एका धुक्यातली जंगलातून जाणारी पाऊलवाट. वेळ रात्रीची. पडदा उघडण्यापूर्वी एका अपघाताचे आवाज. जे काळोख व शांतता चिरत जातात. पडदा उघडतो आणि एका कोपर्यात व्हीलचेअरवर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. या आलिशान बंगल्यात मदतीसाठी एक तरुण शिरतो. त्याची गाडी बंद पडलीय. समोर त्या मृत व्यक्तीच्या पत्नीवर प्रकाश पडतो. हा मर्डर कुणी केलाय? ही विचारणा तरुण महेश माने करतो… आणि दृष्ट शिकारी व अपंग नवर्याचा खून मीच केलाय, असं मालती सांगते. नवर्याचा खून बायकोनं केलाय आणि नेमकं हेच लपविण्यासाठी महेश एक ‘नाटक’ रचतो. कुणीतरी खून करून पळून गेलाय आणि त्याचे रिव्हॉल्वर मला सापडलंय, असा डाव रचण्यात येतो. हा खून खरोखरच कुणी केलाय, याभोवती पोलीस तपासात या घरातले आणि बाहेरचेही एकेक अडकले जातात. संशयाची सुई प्रत्येकावर येते. आणि सुरू होतो सापशिडीचा विलक्षण खेळ!
खून झालेल्या मालतीने उघडपणे खूनी असल्याची कबुली महेशसमक्ष दिली असली तरी मालतीचा प्रियकर सिद्धेश हा त्याचवेळी तिथे आल्याचे कळतं. नवर्याचा खून करून प्रियकरासोबत जाण्याचा बेत असावा, अशी शंका येते. तर मालतीची सासू मनोरमा पाठारे हिचा खून झालेला मुलगा सावत्र असतो. त्यामुळे तिने आपल्याला सारी संपत्ती मिळावी यासाठी डाव रचला असावा ही शक्यता वाटते. पिस्तुलीसोबत फिरणारा मनोरुग्ण मुलगा अमोघ. याच्यावरही संशय घेण्यास काही घटना आहेतच. या घरात दोघे नोकर. एक ज्युली, अमोघला सांभाळणारी आणि दुसरा गोविंदा, या बंगल्याबाहेरच्या आऊटहाऊसमध्ये राहाणारा. दोघेही संपत्तीच्या स्वार्थासाठी खून करू शकतात, असंही दुसर्या अंकात वाटत राहातं. इन्स्पेक्टर घारगे आणि कवीमनाचा त्यांचा साथीदार शिंदे हे दोघेही याचा तपास लावण्यासाठी शोधमोहीम पूर्ण करतात. सवाल-जवाब, प्रश्न-उपप्रश्न, संवाद-विसंवाद, शक्यता-अशक्यता यातून या बंगल्याचा मालक पाठारे याचा खरा खुनी कोण? हे शेवटच्या क्षणी उघड होते. पण हा खिळवून ठेवणारा खेळ सशक्त संहिता आणि कल्पक दिग्दर्शन यामुळे रसिकांना कमालीचा हादरून सोडतो.
आगंतुक आलेल्या महेशच्या भूमिकेत सौरभ गोखले याने सहजतेने वावर केलाय. देहबोली शोभून दिसते. कथेतील गूढता वाढविण्यासाठी काही प्रसंग ताकदीने पुढे येतात. शर्वरी लोहकरे हिची मालतीची घबराट विलक्षणच. अजिंक्य भोसले हा प्रियकर कम पुढारी नजरेत भरतो. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यातून दिसते. प्रॉपर्टीच्या मालकीसाठी आईचा प्रयत्न विनिता दाते हिचा दिसतो, तर मतिमंद मुलाच्या भूमिकेत हर्षल म्हामुणकर याने प्रत्येक प्रवेशात नाट्य अधिकच संशयाच्या टोकापर्यंत पोहचविले आहे. ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणारा ग्रामीण देहबोलीचा गोविंदा (प्रमोद कदम) मस्तच. गोवेकर असणारी ज्युली (नेहा कुलकर्णी) हिने या संशयनाट्यात भर पाडली आहे. धनेश पोतदार यांचा इन्स्पेक्टर शिंदे काही क्षण विरंगुळा देतो. इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत संदेश जाधव याने हे थरारनाट्य रंगविण्यासाठी आपल्या हुकमी अभिनयाने बाजी मारलीय. नऊ जणांच्या या ‘टीम’ची भट्टी चांगली जुळली आहे.
खुनी वाटणार्या माणसावर आरोप पक्का होत असतानाच दुसर्याच आणखीन एकावर खुनी असल्याची खात्री पटू लागते. अशा प्रकारे हे संशयचक्र दोन अंकात खिळवून ठेवतेय. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हा ‘खेळ’ चांगला मांडलाय. त्यात कुठेही गती कमी होत नाही. तांत्रिक बाजूंचा पुरेपूर वापर केलाय. नाटकाचा प्रारंभ आणि शेवट नजरेत भरतो.
नव्या पिढीचा ताकदीचा नाटककार नीरज शिरवईकर याने अॅगाथा ख्रिस्ती यांच्या ‘दि एस्पेक्टेड गेस्ट’ या कादंबरीवर या नाटकाची संहिता उभी केलीय. याच कथानकावर बी. आर. चोपडा यांनी ‘धुंद’ या गाजलेल्या सिनेमाची निर्मिती केली होती. ‘क्वीन ऑफ क्राइम’ अशी जिची ओळख आहे, तिच्या त्या इंग्रजी कादंबरीचा आधार या नाटकाला आहे. प्रा. मधुकर तोरडमल यांनीही त्यांच्या गुप्तहेर कादंबर्यांचे अनुवाद केले होते. मराठी नाटककारांनी अॅगाथा ख्रिस्ती यांच्या अनेक कथाबीजांना यापूर्वी नाट्यरूप दिलेय. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संशयाचे प्रश्नचिन्ह संपता संपत नाही. नाटककार नीरज शिरवईकर याने नजरबंदीचा हा नाट्यखेळ संहितेतून पक्का पकडला आहे. गुरुस्थानी असलेले दिग्दर्शक केंकरे आणि शिष्योत्तम शिरवईकर यांची ही रंगयुती मराठी रसिव्ाâांच्या आशा वाढविणारी आहे. जी शब्दबंबाळ नाही किंवा पारंपारिकही नाही.
जंगलातील आलिशान बंगला. त्यातील भिंतीवर लटकलेले प्राण्यांचे मुखवटे, खिडकी-दारे यापुढे असणारे जंगल, धुक्यातील रात्रीची भयानकता- हे सारं काही नेपथ्यरचनेत नाटककार शिरवईकर याने नेपथ्यकार म्हणून पेललं आहे. नेपथ्याची उत्तम जाण त्यातून दिसते, जी कथेला पूरक ठरतेय. प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांनी प्रकाश आणि अंधार तसेच धुकं आणि जंगल याची कमाल प्रकाशातून केलीय. जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे गूढता वाढविणारे संगीत आणि मंगल केंकरे यांची वेशभूषाही नाट्याला शोभून दिसणारी. सारी तांत्रिक अंगे उत्तमच! तांत्रिक बाजू आणि जाहिरातींपासूनच अर्थपूर्णता आणण्याचा प्रयत्न दिसतोय. हे नोंद घेण्याजोगे.
‘अ परफेक्ट मर्डर’ या गाजलेल्या रहस्यमय नाटकामुळे रसिकांची अशा शैलीतल्या नाटकाबद्दल उत्कंठा ही स्वाभाविकच वाढली आहे. त्या नाटकाला रसिकांनी चांगली दाद दिली. फ्रेडरिक नॉट या नाटकावरून त्याची कथासूत्रे घेतली होती. त्यावर इंग्रजीत सिनेमाही आला होता. एका फसलेल्या खूनकटाची उकल त्यात होती. त्याच प्रकारे ‘यू मस्ट डाय’ यातही एक गुंतवून ठेवणारे रहस्यनाट्य आहे. ‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये पडदा उघडताच ‘खून’ दिसतो, तर यात पडदा उघडण्यापूर्वी अपघात आणि खून करण्यात आल्याचे दृश्य दिसते. हे भयनाट्य नाही तर थरारनाट्य आहे. दोन्ही नाटकांत इन्स्पेक्टर घारगे हे पात्र कॉमन आहेत. त्यात सतीश राजवाडे होते तर इथे संदेश जाधव. दोन्ही नाटकांची तुलना करण्याचा प्रयत्न नाही, पण ही थरारनाट्याची चढती कमान आहे, जी नव्या रसिकांना आकृष्ट करणारी दिसतेय.
मराठी साहित्यात तुफान लोकप्रियता मिळविणारे रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांच्या अनेक कथा गाजल्या. त्यांनी हेमचंद्र साखळकर या टोपणनावानेसुद्धा लेखन केले. वसईचे बाबूराव अर्नाळकर (चंद्रकांत चव्हाण) यांनी तर शेकडो रहस्यकथा लिहिल्या. त्यावेळी त्यांचा स्वतःचा फॅनक्लबही होता. जगभरातल्या सर्वाधिक रहस्यकथा लिहिण्याचा मान त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांच्या झुंजार कथा कदापि विसरता येणं शक्य नाही. रहस्यकथांची पार्श्वभूमी मराठी साहित्याला काही प्रमाणात जरूर आहे, पण परकीय साहित्याशी तुलनेत तशी कमीच. त्याचेही पडसाद हे नाट्यसहितांच्या विषयांवर आजवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झाले. असो.
लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या मध्यंतरानंतर रंगभूमीवर मनोरंजनात्मक नाटकांचा महापूर आला असला तरीही रसिकांची अभिरुची बदलत चालली असल्याचे दिसते. घरबसल्या इंग्रजी चित्रपट, कथा-कादंबर्या यातून त्यांचे कुतूहल प्रचंड वाढले आहे. परिणामी अशा वैविध्यपूर्ण हटके शैली व विषयांमुळे वेगळी वाट तयार झालीय. हाताच्या बोटावर मनोरंजनाचे पर्याय असूनही दर्दी रसिक नाट्यगृहाकडे ओढला जात आहे. हे निरीक्षण सकारात्मक आणि आनंददायी असेच आहे. ते नाट्यसृष्टीचे बळ वाढविणारे आहे.
यू मस्ट डाय
लेखन / नेपथ्य – नीरज शिरवईकर
दिग्दर्शन – विजय केंकरे
संगीत – अशोक पत्की
प्रकाश – शीतल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
निर्माती – अदिती राव
सूत्रधार – संतोष शिदम
निर्मितीसंस्था – प्रवेश / वरदा क्रिएशन्स