गुजरातची विधानसभा निवडणूक आता जवळ आली आहे. प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पोकळ बडबोलेपणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे दोन पावले असलेले आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अधिकाधिक वेळ गुजरातेत दिसत आहेत. त्यावरून दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाने ‘दिल्लीला पूर्णवेळ मुख्यमंत्री हवा’ अशी खोचक मागणी केली आहे. या न्यायाने देशाला पूर्ण वेळ पंतप्रधान असण्याचीही गरज आहे, याचा भाजपला सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. देशाचे पंतप्रधान हे गुजरात राज्याचे पडद्यामागचे मुख्यमंत्री, भाजपचे स्टार प्रचारक आणि देशाचे अघोषित परराष्ट्र मंत्री या भूमिकांमध्येच सर्वाधिक काळ वावरताना दिसतात; आपण देशाचे पंतप्रधान आहोत, एका पक्षाचे प्रचारप्रमुख नाही, याची त्यांना कधी आठवण करून देणार? ते करण्याची हिंमत भाजपच्या सोडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही कोणत्याही पदाधिकार्यांत नाही. कारण, मोदीच भाजपला निवडणुका जिंकून देतात, तेच त्यांचे प्रमुख काम आहे.
आता मोदींच्या बरोबरीने भाजपचे सगळीकडचे पदाधिकारी, मंत्री, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वगैरे मंडळीही प्रचारात उतरली आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर तोफ डागली आणि काँग्रेसने गुजरातचे वाट्टोळे केले, अशी छाती पिटून घेतली. कांगावखोरपणाचे एव्हरेस्टसारखे सर्वोच्च शिखर असेल, तर ते मोदींनी या विधानातून सर केलेले आहे आणि त्यांचा हा विक्रम मोडणे अशक्यप्राय आहे. काँग्रेसने गुजरातचे वाट्टोळे केले? कधी? गेली तब्बल २७ वर्षे तुमचीच सत्ता आहे गुजरातेत. तरी वाट्टोळे काँग्रेसनेच केले? समजा, काँग्रेसने वाट्टोळे केलेच होते तर गेली २७ वर्षे तुम्ही राज्यात गवत उपटत बसला होतात का? त्या वाट्टोळ्याचे आपण गोल, चौकोनी, लंबगोलाकार, चपटे, फुगीर वगैरे काय केले, ते सांगा की! की तसे सांगण्यासारखे काहीच नाही. एकीकडे एका सभेत म्हणता, हा मी घडवलेला गुजरात आहे, दुसरीकडे म्हणता, काँग्रेसने वाट्टोळे केले! या तो चतुर कहो, या घोडा कहो, ये चतुर-घोडा-चतुर-घोडा क्या लगाया है? (इच्छुकांनी चतुर-घोडा प्रकरण समजून घेण्यासाठी ‘पडोसन’ चित्रपटातील ‘एक चतुर नार’ गाण्याचा अभ्यास करावा.)
गुजरात म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजेच गुजरात अशी एक भ्रामक प्रतिमा गेल्या २७ वर्षांत तयार करण्यात आली आणि तिचाही सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा मोठा कटआऊट उभारून २०१४ साली तो अख्ख्या देशातल्या जनतेला हुशारीने विकण्यात आला. गुजरातमध्ये ‘मोदी मोदी’ या जयजयकारापलीकडे काहीच ऐकू येत नाही, अशी समजूत करून दिली जात असतानाही काँग्रेस पक्षाचा जनाधार तब्बल ४० टक्क्यांहून अधिक होता आणि तो तेवढाच राहिलेला आहे. २०१९च्या निवडणुकीत तर भाजपचे नाक कापले जाता जाता राहिले आहे. १००च्या आत रोखले काँग्रेसने भाजपला. मोदी सांगतात त्याप्रमाणे गुजरातेत सुशासन सुरू आहे, खुद्द मोदींच्या मायेची पाखर त्यांच्या गृहराज्यावर सावली धरून असते कायम आणि केंद्रात मोदी, राज्यात मोदी असे डबल इंजीनचे सरकार आहे, असे असताना २०१९ला निष्प्रभ, दिशाहीन काँग्रेसने तुमच्या तोंडाला फेस का आणला होता?
आता केजरीवालांच्या रूपाने एक नवे बाहुले नाचवले जाते आहे. केजरीवालांना सुरतेत चांगला प्रतिसाद मिळाला. पण, तेही मोदींप्रमाणे राईचा पर्वत करण्यात आणि ड्रामेबाजीत पटाईत. आता आम्ही काँग्रेसला संपवून टाकू, काँग्रेसच्या पाच जागा पण येणार नाहीत, अशा डरकाळ्या ते फोडत आहेत आणि केजरीवालांनी काँग्रेसची मते खाल्ली की काँग्रेस संपलीच, अशी दिवास्वप्ने सुपारी घेतलेले राजकीय विश्लेषक विश्लेषणाच्या नावाखाली मांडत आहेत. केजरीवालांचा पक्ष भाजपचे एकही मत खाणार नाही का?
या निवडणुकांच्या तोंडावर घात करून महाराष्ट्रातले स्थिर सरकार पाडून गुजरातसाठी राबणारी दुक्कल बसवली गेली, तिने महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रकल्प गुजरातच्या झोळीत घातले. गुजरात किती उद्योगस्नेही आहे, याचे गोडवेही निलाजरेपणे गायले गेले. गेल्या २७ वर्षांत मोदींसारख्या जागतिक पातळीवरच्या विकासपुरुषाची एकहाती सत्ता असताना, फोटोशॉप करून फिरवल्या जाणार्या फोटोंमध्ये गुजरात जणू संपन्न परदेशच असावा, अशी चित्रे दिसत असताना ट्रम्प आले तेव्हा झोपड्या झाकायला भिंती का उभाराव्या लागल्या? कोरोनाकाळात ठायी ठायी पेटलेल्या चिता झाकण्यासाठी पत्रे का मारावे लागले? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुजरातचेच पुत्र असलेले पंतप्रधान आणि गृहमंत्री प्रचारामध्ये, गुजरातच्या आजवर झालेल्या विकासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्हाला निवडून द्या, असे म्हणताना का दिसत नाहीत? पंतप्रधान बेजबाबदारपणे पाकिस्तानी हल्ल्याचा संदर्भ देशातील मुसलमानांशी जोडून सगळा मुसलमान समाज पाकिस्तानधार्जिणे असल्याचा प्रचार करतात. गृहमंत्री २००२ साली दंगेखोरांना धडा शिकवल्याच्या वल्गना करतात. आता पूर्णवेळ बुलडोझर चालक असलेले उत्तर प्रदेशाचे अर्धवेळ मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यापासून पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापर्यंत सगळे स्टार प्रचारक हिंदू-मुस्लिमचा हातखंडा खेळ खेळून मतदारांना आकृष्ट करून घेताना दिसत आहे. काय ही तथाकथित महाशक्तीची केविलवाणी अवस्था!
राहत इंदौरी यांचा प्रसिद्ध शेर आहे. सरहदों पर तनाव है क्या, देखो जरा चुनाव है क्या… पाकिस्तानसारख्या दिवाळखोर, कंगाल देशाचा बसता उठता उल्लेख करून भाजपचे सर्व यंत्रणांमधले सहानुभूतीदार हा शेरच खरा करताना दिसत आहेत. दुर्दैवाने, आज सीमेवरचा तणाव खरा असो की बनाव असो- देशांतर्गत राज्याराज्यांमधल्या सीमांवर खराखुरा तणाव निर्माण झाला आहे. ही भाजपच्या चुनावजीवी राजकारणाची परिणती आहे.