(मुरकुटे नि दरगुडे पानटपरीवर बसलेत, बबन्या पानाला एक्स्ट्रा चुना लावतोय. बाजूच्या स्वच्छ भारत रंगवलेल्या भिंतीवर थुकलेल्या पानाच्या पिचकार्यांनी झाड तयार झालेलं आहे.)
मुरकुटे : एवढ्यात रस्त्यावर बसणारी ढोरं सकाळच्याला स्मशानभूमीमागच्या जागेत बसतात वाटतं ना?
दरगुडे : बसत असतील. त्याचं काय?
मुरकुटे : नाही, हल्ली चौकात सकाळी ट्रॅफिक जॅम होत नाहीय ना? त्यावरून आठवलं.
दरगुडे : मग तर तसं मागल्या गल्लीतला विन्या पण दिसत नाहीय ना हल्ली?
मुरकुटे : तो पुण्याला गेलाय ना? कुठल्या कंपनीत नोकरी लागली?
दरगुडे : बास काय राव, अशा रात्रीतून नोकर्या लागत्या काय? त्या बिडव्याच्या पोरीला घेऊन पळालाय तो!
मुरकुटे : कोणती? ती पीचडी करत होती ती पोर का? तिच्या बापाला मागच्याच हफ्त्यात एक बँक मॅनेजरचं स्थळ सुचवलं होतं, पण तिची आई, ‘निदान पांडभर जमीन अस्ती तर बरं झालं असतं.’ म्हणत तोंडावर नकार देऊन गेली होती. ती पोरगी पळवली विन्यानं?
बबन्या : च्यायला, तुम्हालाच जास्त गावच्या खबरा माहितीयत म्हणजे. हे विन्याचं डिटेलवार म्यॅटर मला पण आताच कळलं तुमच्याकडून. तुम्ही एखाद्या चॅनेलमधी बातम्या द्यायला का जात नाही हो मुरकुटे भाऊ?
दरगुडे : त्याच्यावरून आठवलं, खालच्या गल्लीतला कुलकर्णी सध्या कुठल्या चॅनेलचं काम करतोय?
मुरकुटे : त्या नाही का, ‘आम्ही अफवा सोडतो, बातम्या नाही,’ अशी टॅगलाईन असलेल्या चॅनेलचं काम करायचा ना तो? तिथंच आसल.
दरगुडे : भेटला कुठं तर सांग बाबा! चारदोन बातम्या लावतो का विचारायचंय!
बबन्या : तोच का हवाय पण?
मुरकुटे : तो बकवास आहे रे! मागल्या वेळी ग्रामसेवक आणि सरपंचानं मिळून भूमिगत गटाराचे पैशे खाल्ले त्याची बातमी त्याला द्यायला लावली तर त्यानं त्यांच्याकडून घराला स्लॅब टाकून घेऊन बातमी दाबली.
बबन्या : तेच म्हंतो मी! तोच का पाह्यजे पण?
दरगुडे : चॉइस हाय का काही? इथं चार-पाच गावं मिळून एकच तर पत्रकार आहे तो!
मुरकुटे : बातमीदार म्हण! पत्रकार वेगळे रहात्यात.
बबन्या : काय बोलतो गड्या, आता तर मी पण पत्रकार झालोय की!
दरगुडे : काय सांगतोस काय? कुठल्या चॅनेलचं काम करतो रे भावा तू?
बबन्या : बीझेडपी चॅनेल! ‘एक फाऊल मोजतो कुठे?’ टॅगलाईन आहे बघा आमची!
दरगुडे : मग आपली बातमी देतो का?
बबन्या : मसालेदार झणझणीत काही आसल तर सांगा! चॅनेल नवीन आहे ना? टीआरपीसाठी त्यांनी सांगूनच ठेवलंय अश्या बातम्या गोळा करायला.
मुरकुटे : आता ह्या वयात दरगुडे भाऊनं एखाद्या चिनी नाहीतर आप्रिâकन बाईशी दुसरं लग्न केलं तर होईल ब्वा झणझणीत!
दरगुडे : चटकमटक काही नाह्यीये बाबा! हे पाऊसबिऊस पडाना झालाय. ऑगस्ट संपलाय पाऊस नाही. सप्टेंबरात पाऊस नाही पडला तर आता पिकं तर वावरातच सुकलीत पण धरणं भरली नाही तर माणसंबी सुकायची! ही बातमी द्यायचीय रे बाबा!
बबन्या : बास एवढंच?
दरगुडे : एवढंच कसं? एक हंगाम वाया गेलाय शेतकर्यांचा. त्याच्यात मोकार खर्च होऊन जायेले. काहींच्या दुबार पेरण्या झाल्यात म्हणजे औतफाट्याचे दोन खर्च अन बी-बियाण्यांचे खर्च वसूल व्हायचे कसे हा प्रश्न! हा आता कांद्याची निर्यात विना अडथळा चालू दिली, टमाट्याला विना स्पर्धा इकू दिलं, साखर अडवली नाही तर दोन पैशे जास्तीचे मिळून हंगाम वाया गेल्याचं दु:ख इसरता येईल बघ. एवढी बातमी लाव फक्त बास!
बबन्या : ही बातमी मी खरं तर चार आठवड्याआधीच लावणार होतो…
मुरकुटे : मग झालं काय?
बबन्या : तवा त्या नागड्याच्या ष्टोर्या चालू होत्या…
दरगुडे : मग पुढल्या आठवड्यात आणायची ना?
बबन्या : तेव्हा त्या हुकेल गुर्जीच्या बातम्या चालू होत्या…
मुरकुटे : त्याच्यानंतर नेट लावायचं ना?
बबन्या : लावलं होतं! पण त्या अँकर कोहळेला माझ्या बातमीपेक्षा छप्पनकुळेचा बाईट महत्त्वाचा वाटला.
दरगुडे : हां ना. एकतर कुणी बातम्या देईना, अन त्या कुंभकर्णाला पाणी नियोजन करायची जाग पण येईना!
मुरकुटे : कशी येईल? दुसर्या हनिमूनमधून येळ भेटला तर करतील नियोजन!
बबन्या : नाही आता साहेब येणारेत ‘भाषण आपल्या दारी’ करायला, तेव्हा डायरेक एकटं गाठून विचारतो मी!
मुरकुटे : काही इचारु नको, त्याला निरोप दे! येशील तर हंडाभर पाणी घेऊन ये म्हणावं! नाहीतर आमचा बी घसा कोरडा, तुझा बी कोरडा न त्याचाबी कोरडा! वावरागत!