एका सम्राटाला धनुर्विद्येची खूप आवड होती… जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण असेल, याचा शोध घेण्याची त्याची इच्छा होती. खूप धनुर्धरांशी बोलल्यानंतर त्याला समजलं की राज्याच्या सीमेवरच्या जंगलापलीकडच्या पर्वतावर राहणारा एक वयोवृद्ध धनुर्धर हा जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर आहे. त्याला भेटायची आस घेऊन सम्राट राज्याच्या सीमेकडे निघाला.
सीमेवर पोहोचल्यावर एका गावात त्याला विलक्षण चमत्कार दिसला. या गावातल्या प्रत्येक घराच्या दरवाजावर, भिंतीवर, झाडांच्या खोडांवर, ठिकठिकाणी असंख्य बाण रुतलेले होते. तेही सगळेच्या सगळे अचूक लक्ष्यवेध केलेले. लक्ष्याचं जे खडूने आखलेलं वर्तुळ असतं, त्याच्या बरोब्बर मधोमध बाण घुसला होता. हे पाहून सम्राट विलक्षण आनंदला. जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर शोधायला सीमा ओलांडायची गरज नाही, तो तर आपल्याच राज्यात आहे, या कल्पनेने त्याचा ऊर भरून आला. त्याने गावकर्यांकडे चौकशी केली, कोण आहे हा महान धनुर्धर?
गावकरी फिदीफिदी हसायला लागले आणि म्हणाले, सम्राट, कसला धनुर्धर नि कसलं काय, वेडपट शेखचिल्ली आहे, त्याला धड धनुष्य धरताही येत नाही हातात.
सम्राट संतापला आणि म्हणाला, पिकतं तिथं विकत नाही, हेच खरं. त्याला धनुष्य धरता येतं की नाही, हे पाहताय तुम्ही आणि त्याचा अचूक लक्ष्यवेध पाहात नाही? त्याची थोरवी तुम्हाला कळत नाही?
गावकरी म्हणाले, सम्राट, अहो तो कसला लक्ष्यवेध करणार. इकडे तिकडे कुठेही बाण मारतो आणि जिथे बाण रुतेल, तिथे जाऊन त्याच्याभोवती वर्तुळ काढतो. झाला लक्ष्यवेध.