वसंताची पहिली चाहूल घेऊन येणार्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा अंक प्रकाशित होतो आहे. म्हणूनच मुखपृष्ठावर ‘महाविकासा’ची गुढी उभारली आहे. ती पाहून काही महाराष्ट्रद्वेष्ट्यांची तोंडे कडुनिंबाचा पाला खाल्ल्यासारखी कडू झाली असतील… त्याला काही इलाज नाही… इथे त्यांची तोंडे कडूच होत राहणार आहेत… उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि लगेच ‘ऑपरेशन महाराष्ट्र’चा रोंबा सोंबा सुरू झाला. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याच खिशात असल्याच्या थाटात वावरणार्या सुपारीबाजांनी आता एका धक्क्यात महाराष्ट्रातील सरकार पडलेच, असा आविर्भाव आणला. सोशल मीडिया आणि प्रस्थापित माध्यमांमधल्या पगारी आणि बिनपगारी समर्थकांच्या फौजांनी उसने अवसान आणून इटुकल्या पेनड्राइव्हला महाताकदवान परम महासंगणक बनवून दाखवण्याचा प्रयत्न केला… थेट ठाकरे घराण्यावर वार करण्याचा प्रयत्न झाला… पण ते सगळे प्रयत्न फोल ठरले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची सगळी टिवटिव एकाच खणखणीत उत्तराने बंद करून टाकली आणि गुढीपाडव्याला सत्तापालटाची गुढी उभारून दाखवूच अशी पोपटपंची करणार्या भाडोत्री भविष्यवेत्त्यांच्या पिंजर्यांतले पोपट चोच वासून उताणे पडले.
महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारने अडीच वर्षांच्या काळात कोरोनासारख्या महासंकटाचा यशस्वी सामना करून दाखवला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च संविधानिक पदांवरून खेळल्या जाणार्या कमालीच्या विषाक्त, सुडांध सत्ताकारणापुढेही हे सरकार झुकलेले नाही. यापुढची अडीच वर्षेही हेच सरकार राहणार, हे निश्चित आहे. ते विरोधकांनाही माहिती आहे. पण सरकार पडण्याच्या आवया हा विरोधकांचा ऑक्सिजन आहे. इकडून तिकडून गोळा करून आणलेल्या बाजारबुणग्यांची फौज दाणागोटा मिळवण्यासाठी सत्ताधारी गोटात शिरली तर खरोखरचा ऑक्सिजन लावायची पाळी येईल, म्हणून उसने अवसान आणून वल्गना करत राहणे, ही त्यांची मजबुरी आहे. एरवी मोदीकृपेने सगळ्याच गोष्टी महाग होत असताना हे चकटफु मनोरंजन मिळते आहे, हाच एक दिलासा. महाराष्ट्राने राजकारणातले संघर्ष काही कमी पाहिलेले नाहीत. इथे एकाच वेळी वेगवेगळ्या विचारधारांचे दिग्गज नेते एकमेकांशी लढत होते. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कै. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यापासून वसंतदादा पाटील, बॅ. अब्दुल रहमान अंतुले, शरद पवार यांच्यापर्यंत बलाढय काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्यांवर वेळोवेळी प्रखर टीका केली. तेव्हाच्या शिवसेनेकडे शिवसैनिकांची ज्वलंत निष्ठा आणि बाळासाहेबांच्या शब्दासाठी जीवही पणाला लावण्याची तयारी यापलीकडे दुसरे भांडवल नव्हते. बाळासाहेबांच्या शब्दांच्या आणि कुंचल्याच्या फटकार्यांनी दुखावून घेऊन तत्कालीन नेत्यांनी आजच्याप्रमाणे सुडाचा वरवंटा चालवायचा ठरवला असता तर महाराष्ट्रात केवढा मोठा अनर्थ ओढवला असता! विचारांच्या लढाया विचारांनी लढायच्या असतात आणि सगळ्या राजकीय-सामाजिक लढायांच्या मुळाशी महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या भल्याचा विचार असायला हवा, याची जाण तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांना होती. त्यामुळे राजकीय लढायांना व्यक्तिगत शत्रुत्त्वाची डूब कधी मिळाली नाही आणि शिवसेनामुक्त महाराष्ट्र किंवा काँग्रेसमुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असल्या दळभद्री विचारांना महाराष्ट्राने कधी थारा दिला नव्हता. एक देश, एक पक्ष, एक नेता, सगळीकडे एकच सरकार हा थेट लोकशाहीविरोधी विचार आहे, याचं भान ठेवून राजकारण केलं जात होतं.
आज भाजपने राज्यातच नव्हे तर देशभरात चालवलेल्या शिखंडीच्या घृणास्पद सत्ताकारणाला राजकारणही म्हणता येणं कठीण आहे. या वृत्तीने लोकशाहीच्या सर्व आधारस्तंभांना किती प्रमाणात पोखरून काढले गेले आहे, याचे दर्शन दिल्ली उच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’प्रकरणी दिलेल्या निकालातून घडले. ‘गोली मारो सालोंको’ हे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य विद्वेषी नाहीच, प्रचारात असं बोलावंच लागतं, हसून बोललेलं वाक्य गंभीरपणे घ्यायचं नसतं, असं तर्कट विद्वान न्यायाधीश महोदयांनी लावलेलं आहे. उद्या ‘चपलांनी मुस्काट फोडा यांचं’ असं कोणी हसत हसत म्हटलं तर ते चालेल का? किंवा खरोखरच हसत हसत कुणी ते फोडलं तर हे हसत खेळत घेणार आहेत का?
रोज वेगवेगळे दिवटे असे वेगवेगळे दिवे लावत असतात देशात. कारण, भाजपची देश चालवण्याची कल्पना आता सुस्पष्ट झाली आहे. देशाचं संघराज्यात्मक स्वरूपच नष्ट करून विविधतेतल्या एकात्मतेला तिलांजली देऊन एकाच संस्कृतीच्या रंगात सगळ्यांना जबरदस्तीने रंगवून काढायचं, असं या पक्षाचं धोरण आहे; ते लोकशाहीला नख लावणारं तर आहेच, पण भविष्यात देशाच्या एकात्मतेलाही त्यातून तडा जाण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील राज्यांनी महसूल निर्माण करायचा आणि त्या महसुलावर डल्ला मात्र उत्तर भारतातले आयतोबा मारणार, हे दक्षिणेतील राज्ये किती काळ सहन करतील? दक्षिणेत लोकसंख्यावाढीचा दर आटोक्यात आहे. नव्या संसदेच्या उभारणीनंतर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या जागांची फेररचना झाली तर उत्तरेतील सर्वार्थाने मागास राज्यांची शक्ती अपरिमित वाढून महाराष्ट्रासह सगळ्या प्रगत राज्यांचे प्रतिनिधित्व केंद्रीय पातळीवर कायमचे निष्प्रभ होण्याचा धोका समोर येऊन ठाकला आहे.
अशा काळात शिवसेनेच्या भगव्याच्या तेजाने तळपणारी महाविकासाची गुढी खाली खेचण्याचे प्रयत्न तीव्र होणार. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची गुढी उंच उभी ठेवण्याची शपथ आज या गुढीच्या साक्षीनेच घेऊ या..