गांधी देहाने मरून ७३ वर्षे झालीत, नेहरू मरून ५७ वर्षे झालीत.
आजच्या देशातल्या आणि परदेशातल्या कुठल्याही नेत्याने कळत्या वयात त्यांचा कार्यकाळ पाहिलेला नाही, किरकोळ अपवाद वगळता. तरीही त्या दोघांची भुतं पिच्छा सोडत नाहीत. एवढं काय आहे गांधी-नेहरूंनी मानगुटीवर बसावं असं?
गांधी तर फाटका पंचा नेसून वावरणारा मनुष्य पण त्याची दखल अजूनही का घ्यावी लागते?
भारताच्या आधीही अनेक वसाहतींनी स्वातंत्र्य मिळवायला संघर्ष केला, नंतरच्या काळातही केला. अनेक देशांचे तुकडे झाले, अनेक देशांनी साम्राज्य वाढवायला लढाया केल्या. बंदुकांनी, तलवारी घेऊन केलेल्या लढाया लौकिकार्थाने कुणीतरी जिंकल्या असतीलही; मात्र ते देश हरले. आपल्याच भवताली राहणार्या आपल्याच सारख्या माणसांच्या प्रेतांच्या राशीवर उभी राहिलेली साम्राज्यं कुणालाही सुखी समाधानी करू शकली नाहीत, ना न्याय देऊ शकली. अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रह्मदेश, आप्रिâकेतील अनेक देश, रशिया, जर्मनी, कुठलंही उदाहरण घ्या, जगातल्या सगळ्या खंडात हीच स्थिती आहे.
गांधीबाबाने वापरलेली अहिंसा आणि असहकार ही शस्त्रं सोबतीला घेऊन मंडेला लढले. जिथे जिथे गांधींच्या विचारांनी आंदोलन केली गेली तिथे नंतरच्या काळात स्थैर्य लाभल्याच दिसतं. मात्र बंदुकीच्या जोरावर निर्माण झालेल्या देशात प्रदेशात असुरक्षितता आणि भीती कायमच राहिली. द्वेष आणि हिंसेच्या पोटी सूड जन्माला येतो, सुडाचा प्रवास अंतहीन असतो, त्या जमातीने देशाने आमचे पाच मारले तर आम्ही त्यांचे दहा मारू, मग त्यांनी पुन्हा आमचे वीस मारले कि आम्ही पन्नास मारू ही साखळी अंतहीन असते.
‘अॅन आय फॉर आय, मेक्स दी होल वर्ल्ड ब्लाइंड’ हे गांधीबाबाने समजून घेतलं, पराकोटीची विषमता असलेल्या देशात, एकीकडे गावातला जमीनदार शेकडो एकरांचा मालक आणि त्याचा मजूर मात्र भूमिहीन, ही विषमता असलेल्या देशात बंदुकीने स्वातंत्र्य मिळालं, तर याच बंदुका आपल्याच लोकांवर धाक दाखवायला रोखल्या जातील, याची भीती आणि खात्री असल्याने गांधीबाबाने अहिंसेचा मंत्र दिला. मूठभर लोकांनी लढाया करायच्या आणि बाकीच्यांनी प्रेक्षक म्हणून तमाशे पाहायचे या मानसिकतेमधून देशाला बाहेर काढून स्वातंत्र्य आंदोलन सर्वसामान्य माणसांच्या सहभागाने मोठं, परिणामकारक केलं ते गांधीबाबाने. जास्तीत जास्त लोकांकडून कमीत कमी त्यागाची अपेक्षा हे सूत्र ठेवून आंदोलन चाललं म्हणून सगळ्यांना देश आपला वाटला, आंदोलन आपलं वाटलं. हे जगभरातल्या देशांना उत्तम कळतं म्हणूनच गांधीबाबाचं भूत द्वेषाची पेरणी करणार्यांच्या मानगुटीवर बसलेलं असतं.
स्वातंत्र्य मिळताना तांत्रिक पातळीवर असलेली मागास अवस्था, अन्नधान्य उत्पादन आणि लोकसंख्या यामधली दरी, बहुतांशी वस्तूंची आयात अश्या स्थितीत मिळालेला देश चालवताना नेहरूंनी प्रयत्नवादाची कास धरली, दैववादाची नव्हे. देश मार्गाला लागला आणि तोही शेजार्याच्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाला. लोकशाही प्रजासत्ताक स्वीकारून आपण बरोबर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानपेक्षा वेगळी वाट धरली. परिणाम म्हणजे इथं लोकशाही रुजली, नांदली आणि गेली सत्तर वर्षे १९४७च्या तुलनेत देश हळूहळू का होईना एकेक पाऊल पुढे गेला. ७२ वर्षात निम्म्यापेक्षा जास्त काळ लष्करी राजवट असलेला पाकिस्तान, आपल्याच धर्माचे लोक असले तरीही भाषेच्या मुद्द्यावर तुकडे होऊन निर्माण झालेला बांगलादेश आपल्याला ठळकपणे लोकशाहीच महत्व सांगतात. हा वारसा, हे संचित या दोघांनी मागे ठेवलं आणि हे सगळ्या जगाला उत्तम ठाऊक आहे.
म्हणूनच गेली ७२ वर्षे प्रच्छन बदनामी करून, बायकांच्या सोबतचे, सिगरेट ओढतानाचे फोटो व्हायरल करून, कुजबुज मोहिमा राबवूनही आणि ७२ वर्षापूर्वी थेट छातीत गोळी घालूनही गांधी नेहरू मेले नाहीतच, उलट त्यांची भुतं मानगुटीवर बसलेली आहेत.
कर्तृत्व या निकषावर कोरी पाटी असलेल्या लोकांना आपली रेघ मोठी करायला दुसर्याची रेघ खोडणे एवढाच पर्याय कळतो नव्हे तेवढीच त्यांची अक्कल आणि कुवत असते.
आणि अशी दुसर्याची रेघ मोठी करायला गेलं की परदेशात जाऊन मग ही गांधी नेहरूंची भूत समोर उभी राहतात.
जगाने धडा घेतलेला आहेच, प्रश्न आपण धडा कधी शिकणार हा आहे.