पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून देशाची जी पायाभरणी केली, तिच्यावरच आजचा देशाचा डोलारा उभा आहे. नेहरूंच्या नावाची अॅलर्जी असल्याप्रमाणे इथून त्यांचे नाव हटव, तिथे त्यांच्या नावाने खडे फोड, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कंड्या पिकव, त्यांचा धर्मच बदल, असले चिंधीचोर धंदे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा परिवार व्हॉट्सअॅप विद्यापीठातून सतत करत असला तरी नेहरूंचा वारसा पुसला जाणे शक्य नाही. तो पुसला तर या देशाची एकात्मताच संपुष्टात येईल, असा गर्भित इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकताच एका मुलाखतीत दिला आहे. भारतासारखा खंडप्राय देश आपल्या गळाला लागावा, यासाठी त्यांच्या काळातील महासत्तांनी आटोकाट प्रयत्न केले होते. भारताचे धोरण अंमळ पूर्वेकडे म्हणजे रशियाकडे झुकलेले राहिले तरी अमेरिकेतही पंडितजींचा दबदबा होता, त्यांचे स्वागत प्रोटोकॉल सारून उच्चपदस्थांकडून होत असे. आज सत्तासमीकरणे पूर्णपणे बदललेली असली तरी नेहरूंनी घालून दिलेला तटस्थतेचा, मध्यममार्गाचा वारसाच आज नेहरूंविषयी विशेष ‘प्रेम’ असलेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चालवावा लागतो आहे. परराष्ट्र धोरणातली ही कसरत करत राहण्यावाचून देशाला गत्यंतर नाही.