‘जिंदगी बडी कुत्ती चीज होती है’ असा एक लोकप्रिय फिल्मी डायलॉग आहे. सत्ता ही त्याहून ‘कुत्ती चीज’ असते आणि मर्कटाच्या हातात मद्याचा प्याला मिळावा, तशी अपात्रांच्या हातात सत्ता मिळाली, तर ती सर्वार्थाने घातक ठरते. भारतीय लोकशाहीने असे प्रकार अनेकदा पाहिले आहेत. ज्याच्याहाती ससा तो पारधी, या न्यायाने ज्याच्या हाती सत्ता तो चाणक्य, अशी एक गैरसमजूत आपोआप निर्माण होते आणि सोशल मीडियावर ट्रोल पेरले, प्रसारमाध्यमांमध्ये भक्तसंप्रदाय निर्माण केला की ती गैरसमजूत सर्वदूर पसरवणेही शक्य होते. शिवाय यशासारखे यशस्वी काही नसते. यशामागे सारे जग धावते. यशाचाच डंका वाजतो. त्याला अपप्रचाराची जोड दिली की त्रिपुरामध्ये ११ जागा गमावल्या, हे बातम्यांमध्ये येतच नाही, मेघालयात दोनच जागा आहेत, हेही बातम्यांत येत नाही; ईशान्य भारत भाजपने जिंकला, अशा हेडलाइन्स मिळवता येतात.
मात्र, सगळे दिवस सारखे नसतात. दिग्विजयी सम्राटांनाही युद्धात हार पत्करावी लागते आणि स्वघोषित चाणक्यांचे डावही त्यांच्यावरच उलटतात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या उपक्रमातून भारतीय जनता पक्षही हाच अनुभव घेत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार (ते ज्या प्रकारे घोषित झाले तोही एका राजकीय थ्रिलरचा विषय आहे) घोषित झाले, तेव्हापासून त्यांना देशातल्या सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी राहण्याची सवय झाली आहे. तुम्ही त्यांना विश्वगुरू म्हणा किंवा ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणा द्या, तुम्ही बोलत असता ते मोदींबद्दलच. मोदीभक्ती आणि मोदीद्वेष अशा दोन टोकाच्या भावना समाजात तीव्रतेने निर्माण करून मोदी हे जणू हवा, पाणी, प्रकाशासारखे सर्वव्यापी बनले आहेत, अशी प्रतिमानिर्मिती केली गेली होती. ती करताना तिला सर्वात मोठा धोका कोणाकडून आहे, हे भाजपने चतुरपणे ओळखले होते. राहुल गांधी हेच मोदींचे राष्ट्रीय स्तरावरचे प्रतिस्पर्धी असू शकतात, हे लक्षात घेऊन गांधी-नेहरूंची बदनामी, काँग्रेसवर तिखट हल्ले आणि राहुल यांचे ‘पप्पू’करण करून टाकण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपने अत्यंत त्वेषाने राबवला. तो काही काळ यशस्वीही ठरला. त्यामुळेच राफेल घोटाळ्यापासून कोरोनाकाळापर्यंत प्रत्येक वेळी राहुल यांनी दिलेले इशारे खरे ठरले असले तरी त्यांना भारतीय जनमानसाने गांभीर्याने स्वीकारले नव्हते.
या एकतर्फी मांडणीला छेद दिला तो ‘भारत जोडो’ यात्रेने. भाजपच्या हिंस्त्र ट्रोलांनी बुजबुजलेल्या सोशल मीडियावर या यात्रेमुळे पहिल्यांदाच भाजपविरोधी जनमताची लाट पाहायला मिळाली आणि त्याची दखल प्रसारमाध्यमांनाही घ्यावी लागली. मोदींशिवाय कोणाचाही चेहरा पहिल्या पानावर झळकवायचा नाही, विरोधकांच्या बातम्याच द्यायच्या नाहीत, असे वृत्तपत्रांच्या शिखर संघटनेने आदेश दिले असावेत, अशा प्रकारे वागणार्या वर्तमानपत्रांना आणि मोदीचालिसा गाण्यात गुंगलेल्या वृत्तवाहिन्यांना या यात्रेच्या बातम्यांना जागा द्यावी लागली. ज्याला पप्पू ठरवले, तो तपस्वी ठरतो आहे, हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले भाजपच्या नेत्यांना. या यात्रेनंतर संसदेत प्रविष्ट झालेले राहुल गांधी सर्वस्वी वेगळे होते. आत्मविश्वासाने वागणारे होते. त्यामुळेच ताळतंत्र सुटून ‘तुम्ही नेहरू हे नाव का लावत नाही,’ असले अगोचर प्रश्न विचारणारे, संसदेची गरिमा पुन्हा एकदा घालवणारे प्रचारकी भाषण मोदींना करावे लागले.
या टप्प्यापर्यंत भाजप देशातल्या राजकारणाचा अजेंडा ठरवते आहे आणि त्यामागे इतरांना फरपटत जावे लागते आहे, असे चित्र होते. त्याची भाजपेयींनाही इतकी सवय झाली होती की सत्तेचा अमरपट्टाच आपल्याकडे आहे, अशी गैरसमजूत त्यांनी करून घेतली होती. ‘भारत जोडो’ यात्रेपासून राहुल आणि त्यांना साथ देणारे राज्याराज्यांतील विरोधी पक्ष अजेंडा ठरवत आहेत आणि भाजपला त्यांच्यामागे जावे लागते आहे, असे आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळू लागले आहे. त्यात राहुल यांनी अदानी आणि मोदी यांचे विमानातील एकत्र फोटो संसदेत झळकवून अदानी आपके कौन है, असा प्रश्न विचारून सगळ्यात मोठी पंचाईत करून टाकली. याआधी अत्यंत संशयास्पद घोटाळा असलेली नोटबंदी, तेवढाच संशयास्पद पीएम केअर्स फंड, राफेल खरेदी व्यवहार अशा कोणत्याही प्रकरणात खुद्द मोदींकडे अंगुलिनिर्देश करण्याची कोणाची टाप नव्हती. ‘चौकीदार चोर है’ ही राहुल यांची घोषणा जनमानसाची पकड घेऊ शकली नव्हती. पण, अदानी प्रकरणाने मोदी यांच्या स्वच्छ डिझायनर कपड्यांवर डाग लागलेले आहेत, हे नाकारता येणार नाही. राहुल यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, तात्काळ संयुक्त संसदीय समिती नेमणे या मार्गाने राहुल यांच्या हल्ल्याची धार बोथट करता आली असती. पण, सत्तेच्या उन्मादात राहुल यांचे भाषणच पटलावरून काढून टाकण्याचा उफराटा उद्योग लोकसभाध्यक्षांनी केला आणि यांच्याकडे असे लपवण्यासारखे काय आहे, हा संशय वाढीस लागला.
आता ४ वर्षांपूर्वीचे, कनिष्ठ न्यायालयातही न टिकण्याजोगे प्रकरण उकरून, त्यावर निकाल मिळवून, लोकसभाध्यक्षांनी तातडीने खासदारकी रद्द करण्यासारखे पाऊल उचलून अजेंडा आपण ठरवतो आहोत, असा आव भाजपने आणलेला आहे. पण, प्रत्यक्षात ते राहुल यांनी लावलेल्या सापळ्यातच अडकलेले आहेत. राहुल यांना माफी मागून किंवा कायदेशीर पावले उचलून पुढचा घटनाक्रम टाळता आला असता, तो त्यांनी टाळला नाही. आता त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी आली तरी ते मुक्तपणे बाहेर बोलणार आहेतच. त्यांना तुरुंगात डांबले गेले तर सहानुभूती त्यांनाच लाभणार आहे आणि त्यांचा आवाज बंद केला गेला तर त्यांची जागा घ्यायला ‘प्रधानमंत्री कायर है’ असे राजघाटावरून ठणकावून सांगणार्या प्रियांका गांधी मैदानात उतरलेल्या आहेत…
…भाजपच्या स्वघोषित चाणक्यांना जनतेच्या मनातून डिसक्वालिफाय करणार्याच या घडामोडी आहेत.